स्व.बाबासाहेब आगे हत्या प्रकरणातील दुसरी बाजू

बाबासाहेब आगे…प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा, गावाच्या विकासासाठी धडपडणारा एक उमदा तरुण.कुटुंबात कसलाही राजकीय वारसा नसतांना भाजपच्या लोकसभा विस्तारक पदापर्यंत मजल मारली होती. परंतू, दुर्दैवाने काल झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडला.त्याच्या जाण्याने तमाम माजलगावकर हळहळले… प्रत्येक वेळी सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बाबाला वाचवायला कुणीही आले नाही, ही समाजाची एक घोर शोकांतिका म्हणावी लागेल.या निर्घृण हत्तेनंतर उतावीळ पत्रकारितेची ही एक काळी बाजू समोर आली आहे. कोणतीही शहानिशा न करता काही वृत्तपत्रांनी या हत्येला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे. म्हणून हा लेखन प्रपंच!

पोलीस तपासात योग्य ती चौकशी होईलच परंतु बाबासाहेब आगे यांचे सामाजिक कार्य व गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या एका तरुणाच्या मृत्यूनंतर तरी त्याला योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा.

माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव येथे अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिल प्रभाकर आगे यांनी आयुष्यभर मोल मजुरी करून त्याचा सांभाळ केला. बाबासाहेब आगे यानेही अगदी बालपणात मजुरीची पडेल ती कामे करून कुटुंबाला हातभार लावला. शालेय वयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्याने त्याला राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाले. सहकारी बँकेतील नोकरी सोडून तो संघाचा प्रचारक बनला. 2016 च्या भीषण दुष्काळात त्याचे गाव होरपळले होते. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत असे.गावकऱ्यांची पाण्याची अडचण ओळखून बाबासाहेबांनी गावातील होतकरू तरुणांना हाताशी घेऊन गावात असलेल्या तलावातील गाळ काढला. या कामात त्याने पुण्यातील एका नामांकित स्वयंसेवी संघटनेलाही जोडून घेतले. किट्टी आडगावचे नाव राज्य पातळीवर गाजले. नंतरच्या पहिल्याच पावसाळ्यात सदर तलावात भरपूर पाणी साचल्याने गावातून दुष्काळ कायमचा हद्दपार झाला. गावातील तरुण निर्व्यसनी राहावा, देव, देश आणि धर्माच्या ईश्वरी कार्यात जोडला जावा यासाठी बाबासाहेब आगे सतत प्रयत्नशील राहत असत. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणे ही बाबासाहेबांची सवय होती. इतरांच्या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या बाबासाहेबांना त्यांची हीच सवय घातक ठरली. गावातील एका भगिनीचा संसार सुरळीत चालावा, ती सासरी नांदावी यासाठी बाबासाहेब गावातील मित्रांसमवेत तिच्या नवऱ्याला समजावून सांगण्यासाठी त्याच्या गावी गेले.दरम्यान, प्रकरणात नेहमी मध्यस्थी का करतो, हा राग डोक्यात ठेऊन संशयी स्वभावाच्या नवऱ्याने काल संधी साधून बाबासाहेब आगे यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर काही उतावीळ माध्यमांनी संपूर्ण प्रकरणाची बाजू समजावून न घेता व आरोपीच्या जबाबाची वाट न पाहता या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. हे त्याचे कुटूंब व मित्र परिवारासाठी खूप क्लेशदायक आहे.

बाबासाहेब आगे यांच्या पश्चात पंधरा महिन्यांची मुलगी, चार महिन्यांची गर्भवती पत्नी व थकलेले आई-वडील असे कुटूंब आहे.घरातील कमावता पुरुष, कुटूंब प्रमुख गेल्याने संपूर्ण घर पोरके झाले आहे. देव,देश आणि धर्माच्या कार्यात संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या एका सच्या कार्यकर्त्यांची त्याच्या मृत्यूनंतर बदनामी नको, हि माफक अपेक्षा माध्यमांकडून आहे.या प्रकरणात पोलीस योग्य तपास करतीलच. परंतु,बाबासाहेब आगे यांच्या हत्येमागील सत्य बाजू समाजा समोर आली पाहिजे.

Leave a Reply