ब्राह्मण समाजासाठी लवकरच महामंडळ स्थापन होणार

माजलगाव, दि.१२: ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासासाठी लवकरच श्री परशुराम महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. आ.प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केकेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ब्राह्मण समाजात आर्थिकदृष्ट्या हलाखीची स्थिती असलेली अनेक कुटुंबे आहेत. भिक्षुकी करणाऱ्या ग्रामीण भागातील या समाजाची स्थिती बिकट आहे. या समाजाच्या आर्थिक विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्वरित स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, ब्राह्मण व खुल्या प्रवर्गातील इतर समाजांच्या कल्याणासाठी अमृत संस्थेची निर्मिती आधीच करण्यात आली आहे. तिचे मुख्यालय पुणे आहे. या समाजघटकांच्या कल्याणात ही संस्था कमी पडली तर महामंडळाची स्थापना केली जाईल असे सागितले. सरकारच्या या निर्णयाबद्दल परशुराम सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विनायक रत्नपारखी व सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

Leave a Reply