शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद;सरकारचे कौतुक करावे तेवढे थोडे: सुधीर थोरात

शिवस्वराज्यभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद

पुणे, दि.१२ (प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या स्वराज्यभिषेक महोत्सवासाठी शिंदे- फडणवीस सरकारने ३५० कोटी रुपयांची तरतूद केली असून शिवशंभूच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ही ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,असे प्रतिपादन श्री शिवशंभू विचार दर्शनचे राज्य संयोजक सुधीर थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थ संकल्प सादर करताना शिवप्रेमी जनतेस अभिप्रेत व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या मान्य करुन त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई,अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावर आधारित उद्यानांची निर्मिती करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणे.याबरोबरच शिवछत्रपती व धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करणे आदी निर्णयांचा समावेश आहे.

 

श्री शिवशंभू विचार दर्शनच्या वतीने वरील मागण्याबाबत वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. शिवप्रेमी जनतेस अभिप्रेत असलेल्या अनेक प्रलंबित मागण्या मंजूर करून त्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली असल्याने महाराष्ट्रात शिंदे-फडणविस यांच्या रूपाने शिवभक्तांसाठी खऱ्या अर्थाने शिवशाही अवतरली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्त भारावून गेले आहेत. सरकारच्या या कौतुकास्पद निर्णयाबद्दल श्री शिवशंभू विचार दर्शन च्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो, असे सुधीर थोरात यांनी म्हटले आहे.

Leave a Reply