आ.प्रकाश सोळंकेंच्या मिशन विधानसभेची सुरवात ‘छत्रपती’पासून?

छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक बिनविरोध

माजलगाव, दी.१२. (पवन मोगरेकर):

तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत, ही मिशन विधानसभेसाठी केलेली साखर पेरणी तर नाही ना? अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

माजलगाव तालुक्यात छत्रपती साखर कारखान्याची सुरवात साधारण आठ-नऊ वर्षांपूर्वी झाली. त्यापूर्वी कारखान्याच्या मार्गात आमदार प्रकाश सोळंके अडथळे आणीत असल्याचे आरोप माजी आमदार तथा कारखान्याचे संस्थापक बाजीराव जगताप यांनी वारंवार केले होते.दरम्यानच्या काळात साखर कारखाना सुरू झाला २०१५-१६ साली झालेल्या निवडणुकीत प्रकाश सोळंकेनी पॅनल उभा करण्यासाठी आकाश पाताळ एक केले होते. त्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक होते. परंतु नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत आमदार सोळंके यांच्या वतीने एकही अर्ज न आल्याने मोहन जगतापांच्याच हातात कारखान्याची सूत्रे राहणार आहेत. दरम्यान, प्रकाश सोळंके आमदार असून राज्य साखर महासंघावर संचालक म्हणून त्यांची निवड झाली आहे. कदाचित अशोक डक यांच्या प्रमाणे लॉटरी लागून ते अध्यक्षही होऊ शकतात. परंतु छत्रपती साखर कारखाण्याची निवडणूक बिनविरोध होऊ देणं यात पुढल्या विधानसभेसाठी काही जणांनी साखर पेरणी तर केली नाही ना? अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.


‘मोहन जगतापांना गुलाल लागू देणार नाही’…अशी प्रतिज्ञा काही जणांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकी नंतर केली होती, असे अनेक जण खाजगीत सांगतात. परंतु सगळ्यांना धोबी पछाड देत मोहन जगतापांनी पहिल्याच निवडणुकीत गुलालाची उधळण केली आहे.
निवडणूक बिनविरोध पार पडली ही घटना वरवर पाहता साधारण वाटत असली तरी यामागे प्रकाश सोळंके यांची राजकीय खेळी असल्याचे माजलगावातील राजकीय जाणकार दबक्या आवाजात सांगत आहेत. काय खरे काय खोटे याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच.

Leave a Reply