देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर…
मुंबई: 2019 च्या विधानसभा निवडणुकीत “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन!” असा दावा करणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा आले; पण विरोधी पक्ष नेता म्हणून… त्यानंतर ते पुन्हा आले, पण उपमुख्यमंत्री म्हणून… आता मात्र ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आले आहेत…!
वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरंच खरे आहे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसाची रजा घेऊन खाजगी दौऱ्यावर गेल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार तीन दिवसासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
आम्ही काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असली तरी मुख्यमंत्री पदाची भाजपची लालसा लपून राहिलेली नाही. शिंदेंना बदलून फडणवीसंना मुख्यमंत्री पद द्यावे, असे अनेक भाजप नेत्यांना वाटते. यावरून विरोधक सतत भाजप ला डिवचत असतात.