५० दिवसात आरक्षणावर मार्ग काढू: सरकार
चौंडी: अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर, अध्यक्ष बाळासाहेब दोडताले यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “२१ सप्टेंबरला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार आणि सर्व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांची मुंबईत बैठक झाली. राज्य सरकारने त्यांच्या मागणीला न्याय म्हणत एकमताने पाठिंबा दिला. या आरक्षणासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. काही गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत. त्या गोष्टी सोडवण्यासाठी शासन अतिशय गंभीर आणि कटिबद्ध आहे.”
आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेणार…
या आंदोलनाच्या काळात धनगर समाजाच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आली होती.तेही सरकारने मान्य केलं आहे. हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
५० दिवसात आरक्षणावर मार्ग काढू: महाजन
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले, “आवश्यकता भासल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्च न्यायालायाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक करण्यात येईल. यासाठी शासन आपली पुढील कार्यवाही करेल. या तांत्रिक गोष्टी पुढील ५० दिवसात पार पाडल्या जातील. आधीच्या बैठकीत दोन महिने सांगितले होते. मात्र, उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की त्या बैठकीला ८ दिवस होऊन गेलेत. त्यामुळे पुढील ५० दिवसांमध्ये ही कार्यवाही पूर्ण करावी. जेणेकरून या आरक्षणातील अडचणी दूर होतील.”
दरम्यान,सरकारच्या वतीने यशवंत सेना शिष्ट मंडळास लेखी आश्वासन देण्यात आले असून, याद्वारे कळविण्यात आले आहे की, येत्या ५० दिवसांत आरक्षणावर मार्ग काढण्यात येईल.