सेवा है यज्ञ कुंड…

मानव व प्राणीजगताची सेवा हे दैवी नियमांचे पालन समजले जाते.म्हणूनच सर्व धर्म,पंथांमध्ये सेवा हे पुण्यकर्म मानले गेले आहे. कोणत्याही निजी हेतू शिवाय केली जाणारी विनाशर्त,नि:स्वार्थ सेवा सार्थकी लागत असते. सेवावृत्ती हा एक संस्कार मानला गेला आहे. समाजात सेवावृत्ती दुर्मिळ होत चालली असताना काही लोक मात्र आजही “सेवेच्या ठायी तत्पर…” या समर्पित वृत्तीने जनसेवा करताना दिसतात. यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे देवदूत मा.डॉ.ओमप्रकाशजी शेटे होय! ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ मानून रुग्णसेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे ओमप्रकाशजी यांचा आज वाढदिवस! त्यानिमित्त त्यांच्या अनमोल कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न…

शाळेत असताना वह्या पुस्तके खरेदी करण्यास असमर्थ असणाऱ्या बालमित्रांना वह्या-पुस्तके घेण्यास मदत करण्यापासून त्यांच्या समाजसेवेला प्रारंभ झाला. समाजाच्या मुख्य प्रवाहा पासून मागे राहिलेल्या लोकांच्या उत्थानासाठी काहीतरी ठोस असे विधायक कार्य केले पाहिजे,असे त्यांना सतत वाटायचे. गोरगरीब लोकांची ठिकठिकाणी होणारी अडवणूक व परवड पाहून त्यांचे संवेदनशील बाल मन हेलावून जात असे. आपण समाजाचे देणे लागतो. सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी समाजोपयोगी रचनात्मक कार्य केले पाहिजे, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.अशातच त्यांच्या एका मित्राला दुर्धर आजाराने गाठले. त्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी ओमप्रकाशजींनी प्रचंड धडपड केली. यादरम्यान त्यांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत, असाहाय रुग्णांची उपचारा अभावी होणारी परवड तसेच काही कॉर्पोरेट दवाखान्यांकडून रुग्णांची होणारी प्रचंड आर्थिक लूट जवळून पाहायला मिळाली. ही घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येकाला योग्य उपचार मिळावेत,गोरगरीब रुग्ण उपचाराअभावी मरू नयेत. हे ध्येय उराशी बाळगून स्वतःला रुग्णसेवेत झोकून दिले. रुग्णांच्या हक्कासाठी त्यांनी आरोग्य क्षेत्रातील माफीयांशी जीवाची पर्वा न करता दोन हात केले. सबंध महाराष्ट्रातील रुग्णांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार-लाभ मिळवून देण्यात ते आघाडीवर होते. वेळप्रसंगी पदर मोड करून त्यांनी अनेक रुग्णांना जीवदान दिले. पाहता-पाहता त्यांच्या या अनमोल कार्याची महती भाजप नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली. २०१४ मध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओमप्रकाशजी यांना बोलावून घेतले आणि मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी सोपवली. या कक्षाच्या माध्यमातून ओमप्रकाशजी यांनी आरोग्य क्षेत्रात ‘न भूतो’ असे रचनात्मक कार्य उभे केले. साडेचार वर्षाच्या काळात राज्यातील २१ लाख लोकांना उपचारासाठी आर्थिक सहकार्य दिले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या निधी बरोबरच महात्मा फुले जीवनदायी योजना, दवाखान्यांचा धर्मादाय कोटा यातून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १५०० कोटी (पंधराशे कोटी) रुपयांची मदत देत अनेक रुग्णांना जीवनदान मिळवून देण्याचे पुण्यकर्म केले! मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची खंबीर साथ व विश्वासामुळेच आपण हे शिवधनुष्य पेलू शकलो, असे ओमप्रकाशजी मोठ्या अभिमानाने सांगतात. नियम हे व्यक्तीसाठी आहेत व्यक्ती नियमासाठी नाही. या तत्त्वाने ते काम करतात. परंतु असे असले तरी कधीही कायद्याची चौकट त्यांनी मोडली नाही. एखादं काम कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर चौकट मोडण्या ऐवजी चौकट मोठी करून काम पूर्ण करण्यावर ते भर देतात. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर रडत रडत आलेली लोकं ओमप्रकाशजी यांना भेटल्यानंतर हसत हसत बाहेर पडत. हे नेहमीचे चित्र होते. कोणतेही चांगले काम करताना अडचणी येतात. परंतु,वाटेत काटे आहेत म्हणून चालने थांबवायचे नसते, हे ओमप्रकाशजींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. प्रशासनात मोक्याच्या जागा अडवून बसलेले झारीतील शुक्राचार्य व आरोग्य क्षेत्रातील माफिया यांच्या टोळीने ओमजी यांना धमकावून पाहिले, जीवघेणा हल्ला करण्याचे उद्देशाने अंगावर गुंड सोडले.परंतु, मराठवाड्याच्या चिवट मातीत वाढलेल्या ओमजींनी न डगमगता आपले कार्य अविरत सुरू ठेवले.म्हणूनच लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे देवदूत ही पदवी बहाल केली. लोकांनी बहाल केलेल्या विशेषणास स्मरून अत्यंत समर्पक असे कार्य निरंतर सुरू असते. रुग्णसेवेसाठी त्यांना पदाची आवश्यकता भासत नाही. त्यांच्या शब्दाखातर अनेक ट्रस्ट, धर्मदाय हॉस्पिटल, मोठमोठे उद्योजक, दानशूर व्यक्ती रुग्णांच्या सहायतेसाठी तत्पर असतात. आजही देवेंद्र भाऊंचा हा दूत नरेंद्र भाईंच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्यासोबत रुग्णसेवेत व्यस्त आहे. महाराष्ट्रात केलेल्या कामाची पावती त्यांना देशाच्या राजधानी पर्यंत घेऊन गेली आहे. दिल्ली दरबारी सुद्धा ते आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव उज्वल करतील यात शंका नाही. त्यांनी सुरू केलेल्या आरोग्य सेवेच्या यज्ञात ते समिधा म्हणुन तन-मन-धन अर्पण करत आहेत.ओमजींनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेला आरोग्य सेवेचा यज्ञ अखंड धगधगत राहो! यासाठी आपणास श्री अष्टविनायक दीर्घायुष्य देवो…! जन्मदिनानिमित्त शब्दरुपी शुभेच्छा!!

अशोक दोडताले, संपादक महा जागरण

९४२२०६३२३१

Leave a Reply