मेंढपाळ महिलेच्या उपचारासाठी डॉ.ओमप्रकाश शेटे आले धावून..!

बीड (प्रतिनिधी) :- धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील मंगल जायकुबा चौरे किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. पण डॉ ओमप्रकाश शेटे साहेब यांच्या मदतीमुळे त्या आजारातून मुक्त झाल्या आहेत. वेदनामुक्त झाल्या नंतर चौरे कुटुंबांनी साहेबांची भेट घेऊन आभार मानले. तुमचे उपकार कधीच फिटणार नाही असे बोलून कृतज्ञता व्यक्त केली.

याबाबत सविस्तर वृत्त अशी की, नाकलगावकरांची लेक व कासारी बोडखा येथील सुन सौ. मंगल जायकुबा चौरे यांची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यांचे पती हे मेंढपाळ असून भटकंती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दरम्यान सौ.चौरे यांना कीडनीचा आजार झाला. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व दवाखान्याचा खर्च ऐपती बाहेर असल्याने मागील चार वर्षांपासून त्या वेदना सहन करत होत्या. वेदना असाह्य झाल्यास चार दोनशे रुपये खर्चून खासगी दवाखान्यात तात्पुरते उपचार घ्यायच्या.

क्लीनिक मधील उपचाराने आठ पंधरा ते महिनाभर बरे वाटायचे. मात्र परत प्रचंड त्रास सुरु व्हायचा. असाच क्रम तब्बल चार वर्ष चालला होता. जास्त जास्तच त्रास चालू झाल्याने त्यांना वडवणी येथील रूग्णालयात दाखवले व डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली. त्यामध्ये त्यांच्या किडणीमध्ये मोठ्या आकाराचे चार खडे आढळून आले. डॉक्टरांनी किडणीवर सुद्धा सुज येत आहे त्यामुळे तात्काळ ऑपरेशन करा असा सल्ला दिला.

दिंद्रुड येथे रविवारी आठवडी बाजाराला आल्यानंतर चौरे यांनी हा विषय पत्रकार गणेश काटकर यांना सांगितला. त्यांनी लगेच डॉ.ओमप्रकाश शेटे यांना मंगल चौरे यांची हकिकत सा़ंगितली. साहेबांनी मुतखड्यासाठी शासकीय मदतीचे प्रयोजन नसल्याचे सांगितले. परंतु पेशंट हा गरिब व मेंढपाळ कुटुंबातील आहे म्हणाल्यावर त्यांनी एक मिनीट उशिर न लावता या महिलेचे ऑपरेशन मोफत करून देण्याचा शब्द दिला. लागलीच संभाजीनगर येथील एका पंचतारांकित हॉस्पिटलला एक पत्र दिले.

दवाखान्यात गेल्यावर तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम सांगितली. मात्र त्यांच्या जवळचे थोडेफार असलेले पैसेसुद्धा तपासणी साठी खर्च झाले होते. डॉक्टर तर पेशंट ला ॲडमिट करून घेण्यास टाळाटाळ करू लागले. त्यांनी हा प्रकार फोन करुन डॉ.शेटे यांच्या कानावर घातला. साहेब म्हणाले, “डोन्ट वरी, तु काळजी करू नको तु निंश्चित रहा.” अर्धा तासात साहेबांनी फोन लावून यंत्रणा कामाला लावली. तेव्हा संबंधित डॉक्टरच्या लक्षात आल्यावर त्यांना बोलावून घेऊन त्यांची व्यवस्थित चौकशी करून ॲडमिट करून घेतले.

सौ.चौरे यांचे डॉक्टरांनी दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन केले. एवढेच नाही तर त्या पेशंटकडून तपासणीसाठी घेतलेले एक हजार पन्नासही रुपये सुद्धा परत केले. यावेळी पेशंटची आई व नातेवाईक भारावून गेले. खरच आपल्या गावचा माणूस एवढा मोठा अधिकारी असल्याचा त्यांना अभिमान वाटला. आमच्यासाठी ओमप्रकाश शेटे साहेब देवदूतच असल्याचे भावोत्कट प्रतिक्रिया त्यांनी दिली. नाकलगावची लेक व कासारीची सुन असलेल्या सौ.मंगल चौरे यांनी शेटे साहेबांचे अंतःकरणातुन ऋण व्यक्त केले.

Leave a Reply