भारताचे संविधान व लोकशाही कोणाच्या बापालाही बदलता येणार नाही! -प्रा.डॉ.रमेश पांडव

आष्टी (प्रतिनिधी):भारतीय संविधानात दुरुस्त्या करता येतात पण संविधान कधीच कोणाच्या बापालाही बदलता येणार नाही व भारताचे संविधान बदलताच येणार नसल्यामुळे भारतातील लोकशाही कोणालाही कधीच संपविता येणार नाही असे घणाघाती विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेचे सेवानिवृत्त संचालक तथा अखिल भारतीय समरसता गतीविधीचे राष्ट्रीय कार्यमंडळ सदस्य आणि भारतातील ज्येष्ठ विचारवंत, लेखक व प्रख्यात वक्ते प्रा. डॉ. रमेश पांडव यांनी केले.

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व भटके विमुक्त समाजाच्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तर्फे आयोजित विचार सभेत ते आष्टी येथे बोलत होते. ही विचार सभा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या प्रमुख संयोजनातून आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव लातूर व बीड जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री आमदार सुरेश अण्णा धस हे होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा शिक्षण महर्षी ऍड. भीमराव धोंडे साहेब होते.समाजसेवक विजय गोल्हार, भाजपा नेते बबन अण्णा झांबरे, भाजपा तालुकाध्यक्ष ऍड. साहेबराव मस्के, ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक आष्टी चित्र दर्शनचे संपादक प्रा. आनंतराव हंबर्डे, भाजपा बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख, अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे देवगिरी प्रांताचे संघटन उपाध्यक्ष ऍड. बाबुराव अनारसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीधरपंत सहस्रबुद्धे, रा. स्व. संघांचे प. बीड जिल्ह्याचे जिल्हा संघचालक श्यामराव भोजने, रा. स्व. संघांचे आष्टी तालुका संघचालक कैलास रेडेकर, शिवलिंग आप्पा लगड, माझी पं. स. सदस्य लोखंडे आबा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी पुढे बोलताना प्रा. डॉ. रमेश पांडव म्हणाले की संविधान हे आधुनिक व प्रचलित धर्मशास्त्र आहे हे प्रत्येकाने ठामपणे सांगितले पाहिजे. आरक्षणा द्वारे वंचित घटकांनी नोकरी मिळवावीच पण ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांनी डिक्कीचे प्रमुख मिलिंद कांबळे व सुशांत आठवले यांच्या माध्यमातून नोकऱ्या करणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे होऊन उद्योग धंद्याच्या मार्गाने जाणे अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्राचीन भारताचा व्यापार या पुस्तकात भारत हा प्राचीन काळी सुवर्णभूमी होता असे सांगितले असल्यामुळे मुळे आता सर्व वंचितासह 7000 जातींनी एकत्र येऊन भारतास पुन्हा सुवर्णभूमी करणे आवश्यक आहे.

वर्णभेद, जातीभेद, उच्चनिचता, अस्पृश्यता हे सर्व अधर्म आहेत. हे सर्व अधर्म बुडवले पाहिजेत. संविधान या देशात लागू झाल्यामुळे अधर्म बुडवून आता 75 वर्षे झाली आहेत. संविधानाप्रमाणे सर्वांची प्रगती झाली पाहिजे म्हणून गावागावात, घराघरात व मनामनात संविधान पोचण्यासाठी संविधानाचे गल्ली गल्लीत वाचन केले पाहिजे.

आपला समाज 7000 जातींचा आहे याचा विचार करूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्माच्या माणसांसाठी संविधान लिहिले. डॉ. बाबासाहेब हे प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा, प्रत्येक माणसाचा, पशुपक्षी, झाडेझुडपे या सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारे राष्ट्रपुरुष होते. परिवर्तन होणार, हा देश उभा करणार, भिमाच्या स्वप्नातील भारत आम्ही पुन्हा उभा करणार अशी प्रतिज्ञा करून समरसतेतून समता आणण्याचा आपण सर्वांनी मिळून निर्धार केला पाहिजे असे सांगून समरसता म्हणजे समाजातील सर्वांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे ही भावना कृतीत उतरवणे, जे दुःख तुझं ते दुःख माझं व जे सुख माझं ते सुख तुझं ही भावना व त्यानुसार कृती म्हणजे समरसता होय! समरसता हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातील आहे. समरसते शिवाय समता येणे शक्य नाही. सर्वांनी एक विचाराने एकत्र चालल्या शिवाय समता येणार नाही असे अमूल्य विचार त्यांनी मांडले.

हा समाज हा देश या देशातील सर्व साधन संपत्ती कोणत्याही एका जातीच्या किंवा कोणत्याही सवर्णांच्या मालकीची नसून ती या देशातील सर्वांच्याच मालकीची आहे. पण त्याचा उपभोग काही मोजके लोकच घेत आलेत. यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला आणि आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक भूमिकेचे कट्टर समर्थक आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले.

जातीअंतासाठी जाती संस्थेचे उच्चाटन या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे की, आंतरजातीय विवाहचा अंगिकार करून ठरवून आंतरजातीय विवाह केले पाहिजेत; आणि आम्ही त्यांचे कट्टर व कृतिशील समर्थक आहोत असे डॉ. पांडव म्हणाले.

हा देश मोठा करण्याची या देशातील सर्व धर्म संप्रदायांची जबाबदारी आहे असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांवर आईच्या भूमिकेतून प्रेम केले आहे असे डॉ पांडव म्हणाले. हिंदूंचा एकही धर्मग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेला नाही, सर्व धर्मग्रंथ शूद्र अतिशुद्रांनीच लिहिलेले आहेत असे सत्यकाम जाबालीच्या उपनिषदासह महाभारत, भगवदगिता, रामायण यांची उदाहरणे देऊन पुराव्यासह सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इथल्या समाज व्यवस्थेत दुरुस्ती करायची आहे आणि तो विचार आपल्याला जशास तसा पुढे न्यायचा व चालवायचा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे, व्यवहाराचे व कृतीचे पाईक होण्यासाठी ही सभा असल्याचे सांगून त्यांनी सभेच्या आयोजकांचा गौरव केला.

 

अध्यक्षीय समारोप करताना आ. सुरेश अण्णा धस म्हणाले की समता आणण्यासाठी समरस होताना आपण सर्वांनी मिळून असा विचार केला पाहिजे की, ज्यांना शेती आहे त्यांना अनुदान आहे, त्यांच्या पिकांच्या नुकसानीस अनुदान आहे, त्यांना विमा आहे पण ज्यांना जमीन नाही त्यांना काहीच नाही ही असमानता आपल्याला दूर करायची आहे; समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधानात असून सुद्धा आमच्या काही बांधवांवर गुन्हेगारीचा कलंक आहे व असतो तो कृतीतून नष्ट झाला पाहिजे म्हणून भाजप नेते देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस मॅन्युअल मधील गुन्हेगार जमातींना कोणत्याही गुन्ह्यात विनाकारण जेरबंद करण्याच्या पोलीस मॅन्युअल मधील तरतुदीत बदल करून गुन्हेगारीचा कलंक पुसून काढला असे सांगितले. प्राध्यापक डॉ. रमेश पांडव यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुस्तकाचे संच आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात वाटणार असल्याचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी सांगून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व भटक्या विमुक्त यांच्या विकासासाठी व उत्थानासाठी कायम कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माजी आमदार शिक्षण महर्षी ऍड. भीमराव धोंडे साहेब म्हणाले की, भाजपा व संघ परिवारावर संविधान विरोधी लोकशाही विरोधी असा धादांत खोटा आरोप व प्रचार सबळ पुराव्यांनिशी मोडून तोडून टाकण्यासाठी व वंचित समाजाचा बुद्धिभेद करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ची मराठवाड्यातील ही पहिली विचार सभा आहे. ही विचार सभा आयोजित करणारे प्रमुख संयोजक ऍड. वाल्मीक तात्या निकाळजे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक व गौरव केला. या विचार सभेतील विचार गावागावात व घराघरात गेले पाहिजे असे आवाहन त्यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

विचार सभेचे प्रमुख संयोजक भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे ज्येष्ठ मानवाधिकार विशेषज्ञ व संविधानाचे अभ्यासक ऍड. वाल्मिक तात्या निकाळजे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, भारतीय संविधानात घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुच्छेद 13 मध्ये तरतूद करून ठेवलेली असल्यामुळे संविधानाची मूलभूत अधिकाराची व लोककल्याणाची चौकट कोणालाही कधीच बदलता येणार नाही. अनुच्छेद 13 ला घटनादुरुस्तीचा अनुच्छेद 368 कधीच लागू होणार नाही त्यामुळे संविधानाच्या मूलभूत चौकटीत कधीच कोणीच बदल करू शकत नाही. भाजपा संविधानात बदल करणारी पार्टी नाही तर संविधानाची पूजा करणारी पार्टी आहे. याउलट काँग्रेस सरकारने अनेक वेळा संविधानात बदल केला व 1976 साली प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या मूलभूत चौकटीत बदल करण्याचा प्रयत्न करून संविधान संपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनीच 42 व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या प्रस्ताविकेत धर्मनिरपेक्षता व समाजवाद हे शब्द घातले पण त्याबद्दल भारतीय संविधानातील कोणत्याही अनुच्छेदात खंडात व उपखंडात एकही अक्षराची तरतूद नाही. त्यामुळे भाजपा नव्हे तर काँग्रेसच संविधान बदलणारा पक्ष आहे म्हणून काँग्रेस, साम्यवादी व समाजवादी यांच्या खोट्या प्रचाराला व बुद्धिभेदाला आंबेडकरी समाजाने व तमाम वंचित बहुजनांनी धुडकावून लावावे असे आवाहन त्यांनी केले.

 

सभेचे बहारदार सूत्रसंचालन व आभार मन की बात चे तालुका संयोजक सुनील सानप यांनी केले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रमेश पांडव यांचा दीर्घ परिचय ऍड. प्रबोधन निकाळजे यांनी करून दिला. सोबत फुले आंबेडकर चळवळीतील वंचित समाजातील विविध राजकीय सामाजिक पदावर विराजमान झालेले सौ वंदना प्रवीण गायकवाड – अनुसूचित जातीची महिला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक झाल्याबद्दल, एकाच कुटुंबातील मच्छिंद्र घाट विसावे व आजिनाथ मच्छिंद्र घाटविसावे या बाप लेकाचा ग्रा. पं. सदस्य व सह. सोसायटी संचालक झाल्याबद्दल, तिरमली नंदीवाले समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल बाबुराव फुलमाळी यांचा व वॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंग च्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार व संपादक अविशांत कुमकर यांचा मान्यवरांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार समितीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे देवेंद्र गवंडे, रजनीकांत भोसले, बबन लोंढे, मल्हारी भोसले, बबन भोसले, बाळासाहेब बोराडे, संजय गायकवाड, हनुमंत गायकवाड, सनी काळपुंड, विनोद निकाळजे, नितीन निकाळजे, अक्षय निकाळजे, सागर निकाळजे, भाऊसाहेब वाल्हेकर, जितेंद्र वाल्हेकर, तुकाराम शिंदे, मनोहर धनवडे, देवा धेवडे,सागर जगताप, अमोल धोत्रे, किरण साबळे इत्यादीनीं परिश्रम घेतले.

Leave a Reply