अब्दुल सत्तारां विरूद्ध थेट CBI आणि ED कडे तक्रार दाखल! काय आहे प्रकरण…

शेतकऱ्यांनी दाखल केली तब्बल 1400 पानांची तक्रार

मुंबई : शिंदे गटाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मागे लागलेले शुक्ल काष्ट काही संपता संपायला तयार नाही. नागपूर येथे पार पडलेले हिवाळी अधिवेशन सत्तारावरील आरोपांनी गाजले.वाशिमच्या गायरान जमिनीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तारांवर विरोधकांनी केला. आता या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या विरूद्ध सामाजिक कार्यकर्ते व पीडित शेतकऱ्यांनी सीबीआय व ईडीकडे तक्रार दाखल केली आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह 5 शेतकऱ्यांची 1400 पानी तक्रार सीबीआयकडे केली होती.या तक्रारीत 200 शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुरावे दिल्याचा दावा केला आहे. तसंच 28 मुद्द्यांवर सत्तार यांच्या संपत्ती चौकशीची मागणी केली आहे.

कथीत गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सव यानंतर शेतकरी जमीन घोटाळा असे एका मागे एक आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर झाले. आता सिल्लोडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे सत्तार यांच्याविरोधात सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच ईडीकडेही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असून विरोधक सत्ताराविरुद्ध आघाडी उघडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्यमंत्री पद होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडल्यानंतर आताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे कृषी खाते अब्दुल सत्तार यांच्याकडे शिंदेंनी सोपवलेले आहे.अब्दुल सत्तार यांना या खात्यात कसलीही छाप अद्याप पाडता आलेली नाही. उलट ते सतत वादग्रस्त ठरत आहेत. त्यांचे एक ना अनेक घोटाळे विरोधक व सामाजिक कार्यकर्ते उघड करत आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारची प्रतिमा मलीन होण्यापासून वाचवण्यासाठी अब्दुल सत्तारांची गच्छंती करतात की नाही हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply