आपल्या परंपरेच्या संचितातून जे आलेले आहे ते अनेक दोषांनी युक्त आहे. परंतु आपले जे हिंदुत्व आहे, ते त्या परंपरेतील संचितापेक्षा वेगळे आहे. आपल्या हिंदुत्वाचा आत्मा जर काही असेल, त्याची प्रेरणा जर काही असेल, तर या परंपरागत हिंदू समाजाची भावकी एक करणे ही आहे. आपल्याला या विभिन्न जाती-जमातीतून आलेल्या लोकांमध्ये एकत्व निर्माण करायचे आहे. त्यामुळे आपल्या हिंदुत्वाच्या मांडणीचे भांडवल काय असेल, तर तो म्हणजे हाडा-मासाचा हिंदू समाज. आपल्याला या हिंदू समाजाचे ऐक्य घडवायचे आहे. त्यामुळे स्वाभाविकच आपले हिंदुत्व सर्वसमावेशक असले पाहिजे. समाजातील सगळ्यांना स्वाभाविकपणे असे वाटले पाहिजे की, ‘हे हिंदुत्व माझे आहे’. अटलजी जे ‘रग रग हिंदू मेरा परिचय’ म्हणायचे, त्याप्रमाणे या समाजातील सर्व घटकांना वाटायला हवे. एखाद्या व्यक्तीची कालपर्यंतची पार्श्वभूमी काहीही असेल, ती व्यक्ती कोणत्याही जाती-जमातीत जन्माला आलेली असेल, ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या प्रत्येकाला या हिंदुत्वामध्ये माझा परिचय आहे, मला स्थान आहे, असे वाटायला हवे. आणि ते स्थान कोणाची मेहरबानी म्हणून नाही, तर हक्क म्हणूनच असायला हवे. हिंदूंच्या नवीन भावकीची ही जी मांडणी आहे, ती आपण नीट समजून घेतली पाहिजे.
आजही आपल्या देशामध्ये असे बरेच लोक आहेत जे अनेकवेळा बेसूर व चुकीचे विचार मांडतात, ज्यामुळे या नवीन हिंदू भावकीला धक्का पोहचतो. आपण त्या विचारांच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. जर कुणी अवैज्ञानिक विचार मांडत असतील, किंवा भेद उत्पन्न करणारे विचार मांडत असतील, तर आपल्याला ते नाकारावे लागेल. ते आमचे नाही असे सांगावे लागेल.
समजा एखाद्याने शाकाहार हे आपल्या हिंदुत्वाच्या गाभा तत्वांमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले. आपण पाहतो की, सगळ्या जगभर काही ‘डायट प्लान’ चालतात. एखादा म्हणेल की, मी शाकाहारी असणे पसंत करीन. एखादा असे म्हणेल की, दुध देखील एकाप्रकारे ‘ॲनिमल प्रोटीन’ असल्यामुळे मी ते घेणार नाही. परंतु जर आपण हिंदुत्ववादी चळवळीचा एक कार्यकर्ता या नात्याने संपूर्ण हिंदू समाज आपली भावकी मानीत असू, तर आपण हे लक्षात घ्यायला हवे की वयक्तिक पातळीवर शाकाहारी किंवा मांसाहारी असायला काही हरकत नाही पण तो सगळ्या हिंदू समाजाला एका सूत्रात बांधण्याचा कार्यक्रम होऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये असा कोणताही कार्यक्रम हा आपल्या आवडीचा विषय बनता कामा नये ज्यामुळे एकूण आपल्या हिंदू समाजाच्या ऐक्याला, किंवा ते ऐक्य निर्माण करण्याची जी आपली प्रक्रिया चालली आहे त्याला बाधा निर्माण करेल. आम्ही आमच्या पूर्वजांचे कृतज्ञ आहोत ज्यांच्यामुळे आम्ही अस्तित्वात आहोत. परंतु आता हिंदू समाजाला पुढे जर जायचे असेल तर त्याला सर्व ठिकाणांवरून जे चांगले असेल ते घेवून, कात टाकून उभे राहावे लागेल.
डॉ. हेडगेवारांना गोरक्षा चळवळ चालवणाऱ्या एकाने असे पत्र लिहिले होते की, गोरक्षा हा तुम्ही संघाच्या कार्यक्रमात समाविष्ट केला पाहिजे. तेंव्हा डॉक्टर म्हणाले की, “तुमचे काम छान आहे, पण मला हिंदू संघटन करायचे आहे”. त्यामुळे आपली प्राथमिकता काय आहे हे आपण नीट लक्षात घेतले पाहिजे. आपण हे मुलभूत भान राखलेच पाहिजे की, आपली प्राथमिकता ही हिंदू समाज व त्याचे ऐक्य आहे. आहार किंवा वेशभूषेसारख्या मुद्यावर आपण एकही हिंदू गमावता कामा नये. पूर्वांचलातील बांधवांचा आहार व त्यांची वेशभूषा आपल्यापेक्षा फारच भिन्न आहे. पण एखाद्याच्या खाण्या-पिण्यावरून किंवा वेशभूषेवरून आपण त्याचे हिंदुत्व ठरवू शकत नाही. धोतर, पैंट, साडी, टिकली, टिळा किंवा एखादा नवीन पद्धतीचा ड्रेस, या कशावरूनही हिंदुत्व ठरत नाही. पोळी किंवा पुरणपोळी, सतार किंवा गीटार यावरून हिंदुत्व ठरत नाही. हे सर्व संस्कृतीचे बाह्यांग असते. हिंदू समाजाचे एकत्व, त्यांच्यातील बंधुत्व हे त्याचे अंतरंग आहे.
एखाद्यावेळी आपल्याला असे वाटू शकते की आपले काही आवडीचे विषय आहेत जे आपण हिंदुत्वाच्या कार्यक्रमात समाविष्ट केले पाहिजेत. त्यावेळी आपण सावध असायला हवे. बाह्य संकटांशी आपण लढू, पण आपल्या हिंदुत्वाचा सामाजिक आशय हा प्रबोधन युगाचे अपत्य आहे. ते आतमध्ये पाहणारे आहे. सावरकर असतील, डॉ हेडगेवार असतील, ही सर्व मंडळी त्या भारतीय प्रबोधन काळामध्ये घडलेली आहेत. ते हिंदू समाजाचे शत्रु बाहेर शोधत नाहीत. ते म्हणतात की, हिंदू समाजाच्या आतमध्ये काही दोष आहेत. त्यामुळे कुठेतरी याचे आत्मसंशोधन झाले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून पाहिले असता, आपण डोळे उघडून आपल्या स्वत:मधील दोष पाहणे आणि त्या दोषांवर उपाय करणे हे सुद्धा या हिंदुत्वाचाच भाग आहे. ते दोष स्वीकारण्यामध्ये समाजाची कोणत्याही प्रकारे मानहानी नाही. जो समाज आपल्या कालपर्यंतच्या मर्यादा व दोष समजून घेतो आणि त्यात बदल करतो, तोच समाज पुढे जातो, तोच समाज सक्षम होऊ शकतो.
मी नेहमी हनुमानाची एक गोष्ट सांगत असतो. हनुमानाला सीतेने एक मोत्याची माळ दिली. ती फार किमती माळ होती. हनुमान त्या माळेतील प्रत्येक मणी आपल्या तोंडात घालायचा, दाताने चावायचा आणि टाकून द्यायचा. तेंव्हा सीतेने त्याला विचारले की, “अरे इतकी चांगली माळ मी तुला दिली आणि तू हे काय करतोयस?” तर तो म्हणाला की, “मी त्यात माझा राम आहे का नाही ते पाहतोय. त्यात राम नसेल तर तो मणी टाकून देतोय आणि असेल तर ठेवतोय.” त्याचप्रमाणे ज्यामध्ये हिंदूंचे हित नाही ते टाकून दिले पाहिजे. हा “हिंदू हित” फार व्यापक शब्द आहे. संपूर्ण हिंदू समजाला जोडणारे एकत्वाचे सूत्र म्हणजे हिंदू हित. हे हिंदुत्व समजून घेताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, हिंदूंच्या भावकीमध्ये भेद निर्माण करेल, विकल्प निर्माण करेल, असा कोणताही विषय आपल्या हिंदुत्वाचा कार्यक्रम होऊ शकत नाही.
– प्रदिप रावत, पुणे.
(लेखक लोकसभेचे माजी सदस्य आहेत.)