पुरातत्व खात्याचे बीड नगर परिषदेला पत्र
बीड (प्रतिनिधी): बीड हे ऐतिहासिक शहर असून या शहरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. मात्र, नागरिक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाने काही मंदिरांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. यातीलच एक मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर होय. या मंदिराच्या दुरावस्थेविषयी महा जागरण न्यूज पोर्टल ने वृत्त प्रकाशित केले होते. संभाजीनगर येथील पुरातत्व खात्याने या वृत्ताची तात्काळ दखल घेऊन मंदिराच्या स्वच्छते विषयी बीड नगर परिषदेला पत्र दिले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, बीड शहरात किल्ला गेट परिसरात मिलिया महाविद्यालयाच्या मागे कागदी वेस येथे महालक्ष्मी मातेचे एक अत्यंत पुरातन मंदिर आहे. मात्र, स्थानीक नागरिकांची अनास्था आणि नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे या मंदिराची अक्षरशा: कचराकुंडी झालेली आहे. लोक या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होण्याबरोबरच एका पुरातन वारसा व वास्तू पासून आपण दूर जात असल्या बाबतची भूमिका महा जागरण न्यूज पोर्टल ने बातमीमध्ये मांडली होती.
याबाबत महा जागरण न्यूज पोर्टलने दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी वृत्त प्रकाशित करून नागरिक व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रकाशित होताच सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी (जावक क्रमांक 583) पत्र पाठवून मंदिराची देखभाल व स्वच्छता करण्याबाबत सूचना केली आहे.त्यामुळे मंदिराची घाणीच्या विळख्यातून सुटका होऊन भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होऊ शकेल.
#महा_जागरण #maha_jagran #Beed