माजलगाव नगर परिषदेच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती

भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या तक्रारीची शासनाकडून दखल

माजलगाव ( प्रतिनिधी ): कोट्यवधी रुपयांचा घोटाळा व इतर विविध प्रकरणी वादग्रस्त ठरलेले माजलगाव नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले यांची राज्यस्तरीय चौकशी समितीच्या वतीने चौकशी होणार आहे. याबाबत भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी वेळोवेळी शासनाकडे केलेल्या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, माजलगाव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भोसले यांची माजलगावातील संपूर्ण कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली असुन त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या नातेवाईकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.याप्रकरणी सुरुवातीपासूनच भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या गैरकारभाराबाबत वेळोवेळी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून तक्रारीची गंभीरता निदर्शनास आणून दिली होती. तसेच शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनीही याबाबत वेळोवेळी शासन कडे तक्रारी केल्या होत्या.परिणामी या तक्रारींची गंभीर दखल शासनाने घेतली असून नगर विकास विभागाचे अवर सचिव प्रीतमकुमार जावळे यांनी दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, बेलापूर,नवी मुंबई यांना पत्र देऊन विशाल भोसले यांची राज्यस्तरीय चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यास सांगितले आहे. विविध वादग्रस्त मुद्द्याबाबत चौकशी होणार असून यामध्ये प्रामुख्याने सफाई करताना सहा वर्षीय बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली जेसीबी मशीन हे मुख्याधिकारी भोसले यांच्या भावाच्या नावाने नोंद असणे, विविध कंत्राटामध्ये वापरण्यात आलेली वाहने सुद्धा मुख्याधिकाऱ्यांच्या भावाच्या नावाने नोंद असणे. याशिवाय 2020 ते 2022 च्या काळामध्ये जगदीश जाधव, बांधकाम अभियंता व मुख्याधिकारी यांनी स्वच्छतेच्या कामांमध्ये 60 ते 70 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास जिल्हाधिकारी बीड यांना सांगितले होते परंतु अद्याप त्याबाबतचा अहवाल सादर झालेला नाही म्हणून सदर आरोपाबाबत आता राज्यस्तरीय चौकशी समिती चौकशी करणार आहे. यासह विविध गंभीर तक्रारीवर चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करून एक महिन्यात च्या आत अहवाल शासनास सादर करण्यास सांगितले आहे. या चौकशी समितीमध्ये लेखा शाखा, विधी शाखा, तांत्रिक शाखा, बांधकाम शाखा या विभागातील वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

विशाल भोसले

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता बेजबाबदारपणे वर्तन करीत शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अफरातफर तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केलेली असल्याने आता त्यांची चांगलीच पोलखोल राज्यस्तरीय चौकशी समितीच्या माध्यमातून झाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार यात शंका नाही. भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी याप्रकरणी सुरुवातीपासून आवाज उठवला होता. तसेच माजलगावच्या विकास आराखड्याबाबत भूमाफियांना हाताशी धरून आराखड्यात सावळा गोंधळ घातल्या प्रकरणी अरुण राऊत यांनी एक स्वतंत्र तक्रार केली होती. या तक्रारीनुसार सहाय्यक संचालक बीड यांच्यावर शासनाकडून कारवाई होणार आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल माजलगावकरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply