मामा-भाचे अन् भाजपचे फासे!

राजकीय घडामोडीवरील स्पेशल रिपोर्ट

मुंबई l डी.अशोक

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद काही केल्या थंड व्हायला तयार नाही. आज काँग्रेस नेते व सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या मुहूर्तावरच त्यांनी काँग्रेसला राजीनामाचे गिफ्ट दिले आहे.


सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सत्यजित तांबे तसेच बाळासाहेब थोरात यांच्यात तू तू मी मी सुरू असतानाच आज बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याने तांबे प्रकरणाची नवी किनार समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात हे काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा शिंदे – फडणवीस सरकार गठीत झाल्यापासून सुरू होत्या. त्यातच सत्यजित तांबे यांच्या वडिलांनी मिळालेले उमेदवारी नाकारून आपल्या मुलास अपक्ष निवडणूक लढवण्यास लावल्याने ही थोरात यांचीच तिरपी चाल नाही ना? या चर्चेने उचल खाल्ली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “भाजपची दारे सर्वांसाठी खुली आहेत. येणाऱ्याचा योग्य तो उचित मान भाजपमध्ये राखला जाईल” श्री बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा याच प्रवेशामुळे रखडला आहे असे सूत्रांकडून समजते.


सत्यजित तांबे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी सत्यजित तांबे यांचे कौतुक करताना त्यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला होता. परंतु काँग्रेस मात्र नेहमीप्रमाणे थंडच राहिली. आणि फडणवीस यांनी फेकलेल्या फाशामध्ये मामा भाचे अलगद अडकले असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे खात्रीलायक सूत्राकडून समजते.

Leave a Reply