डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या आज्जी मथुराबाई शेटे यांचे दुःखद निधन

दिंद्रूड (प्रतिनिधी):- येथील प्रतिष्ठित व्यापारी कै. सदाशिवआप्पा शेटे यांच्या मातोश्री तथा शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न, ऍड. कीर्तिकुमार व देवदूत डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या आज्जी श्रीमती मथुराबाई बेलाप्पा शेटे यांचे रविवारी रात्री 9.25 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 110 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 9.30 वाजता दिंद्रूड येथे तेलगाव रोड वरील शेटे फार्महाऊस जवळील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथील रहिवाशी असलेल्या श्रीमती मथुराबाई बेलाप्पा शेटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तब्बल चार पिढ्यांच्या साक्षीदार असलेल्या मथुराबाई यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. पतीच्या निधनानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत मोठया हिमतीने संसाराचा गाडा चालवला. मुलगा व नातवांना योग्य संस्कार देऊन त्यांना मार्गदर्शन केले.

मथुराबाई शेटे यांनी 1940 ते 50 च्या दशकात परिस्थितीशी निकराशी लढा दिला. अनेक संकटाशी मुकाबला करत मोठ्या हिमतीने मुलाचा संसार उभा केला. त्यांच्या संस्काराचा परिपाक म्हणून आज त्यांची तीनही नातवंडे मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत. एकेकाळी अनेक खस्ता खाल्लेल्या मथुराबाईंना उत्तरवयात वैभवसंपन्न आयुष्य जगता आले. शेवटपर्यंत त्यांची बुद्धी तल्लख व सर्व अवयव उत्तम प्रकारे कार्यरत होते.

आयुष्यभर शिव उपासनेत आयुष्य गेलेल्या मथुराबाईंना कामदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात सुन, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 9.30 वाजता दिंद्रूड येथे तेलगाव रोड वरील शेटे फार्महाऊस जवळील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेटे परिवाराच्या दुःखात कार्यारंभ परिवार सहभागी आहे.

Leave a Reply