“मॅडम कमिशनर” च्या लेखणीने अजित पवार घायाळ!

माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकरांच्या पुस्तकानं खळबळ

पुणे : पुणे शहराच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या “मॅडम कमिशनर” या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी तत्कालीन पालकमंत्री असा उल्लेख करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१० च्या दरम्यानचं हे प्रकरण आहे. येरवडा येथील तीन एकराच्या जागेवरुन मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात आरोप केले आहेत.दरम्यान, पुस्तकात करण्यात आलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत.

मीरा बोरवणकर लिखित “मॅडम कमिशनर” हे पुस्तक ‘द मिपॅन मॅकमिलन पब्लिशिंग हाऊस तर्फे आज (१५ ऑक्ट .) बाजरात आणलं जाणार आहे.

सदर पुस्तकात ‘द मिनिस्टर’ या प्रकरणात असं म्हटलंय की, त्यांनी नुकताच पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता. त्या पुण्यातील विविध पोलीस स्टेशन क्षेत्रातील गुन्हेगारीचा आढावा घेत होत्या, बैठका घेत होत्या. एका दिवशी त्यांना विभागीय आयुक्तांचा फोन आला आणि तिकडून पालकमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या जागेसंदर्भात चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटल्याचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

पुढे मीरा बोरवणकर लिहितात की, त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्या मंत्र्यांची भेट घेतली. संबंधित मंत्र्यांकडे त्या जागेचा मोठा कागदी नकाशा होता. त्यांनी या जागेचा लिलाव यशस्वी झाला असून जागेचा ताबा सर्वाधिक बोली लावणाऱ्याला देण्यासंदर्भात सांगितल्याचं बोरवणकर यांनी म्हटलं आहे. येरवडा हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असून पोलिसांना या पुढे अशी प्राइम जागा मिळणार नाही,असं उत्तर दिल्याचं बोरवणकर यांनी सांगितलं. नव्या पोलीस आयुक्तांनी जागा खासगी व्यक्तीला दिली अशी चर्चा होईल, असं सांगितल्याचा उल्लेख बोरवणकर यांनी केला आहे. यावर मंत्र्यांनी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितल्याचं बोरवणकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

पुढे बोरवणकर यांनी म्हटलं की, मंत्र्यांच्या सूचनांवर नाराजी दर्शवत यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांनी ही प्रक्रिया का पूर्ण केली नाही जर लिलाव पूर्ण झाला होता, असा सवाल त्यांनी केला. जागेचा ताबा सोपवणं पूर्णपणे पोलीस विभागाच्या विरोधात होतं, आम्हाला म्हणजेच पोलिसांना जागेची गरज असताना ती खासगी व्यक्तींना सोपवणं योग्य नव्हतं, त्यामुळं ताबा न देण्याच्या निर्णयावर ठाम होते. मंत्री यावर नाराज झाले आणि नकाशा त्यांनी टेबलवर फेकल्याचा दावा मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

माझ्यावर दबाव आणला तरी मी त्याची फिकीर करत नाही: अजित पवार 

अजित पवार यांनी या प्रकरणावर बोलताना जागेच्या लिलावात त्यांचा कसलाही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. मी अशा प्रकारच्या लिलावांचा विरोध केलेला आहे. पालकमंत्र्यांना जमिनीचे लिलाव करण्याचा अधिकार नसतो. सरकारी जमिनी आपण विकू शकत नाही. महसूल विभागाकडे ती प्रकरण जातात आणि राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होतात, असं अजित पवार यांनी म्हटलं. माझा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही, असं देखील अजित पवार म्हणाले. तुम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करुन बघा मी अशा प्रकरणांमध्ये शासनाची बाजू घेतलेली आहे. माझ्यावर तशा प्रकरणांमध्ये दबाव आणला तरी मी त्याची फिकीर करत नाही असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply