■ बाभळगाव येथे बांधकाम कामगार संघटनेचा महिला मेळावा
माजलगाव, दि.३० (प्रतिनिधी) :- महिलांना शिक्षण, आर्थिक सक्षम व सुरक्षित करणे ही समाजाची जबाबदारी आाहे. कोणत्याही कुटुंबात त्या घरातील महिलेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे महिलांच्या पंखात बळ भरणे हे समाजाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन बंडूजी खांडेकर यांनी केले. श्रीक्षेत्र बाभळगाव येथील महिलांच्या हळदीकुंकू निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते.
माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बाभळगाव येथे बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी राऊत यांच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू व संगीत खुर्ची हा खेळ ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सपोनि प्रभा पुंडगे होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजप भटके विमुक्त आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष बंडुजी खांडेकर होते. यावेळी पत्रकार नगेश वकरे, बाभळगावच्या सरपंच सत्वशिला बाबुराव सुरवसे, नाकलगावच्या माजी सरपंच मंडोधरी पोटभरे, ग्रा.पं. सदस्य राधाबाई सुरवसे, सुवर्णा निकाळजे जयश्री डाके, प्रयागाबाई सुरवसे, रामेश्वर शिंगणे, एकनाथ डाके आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महिलांना मार्गदर्शन करताना सपोनि प्रभा पुंडगे म्हणाल्या की, एक मुलगी शिकली की ती पुढे पूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. त्यातून योग्य समाज व राष्ट्रनिर्मितीचे काम होते. तसेच पुढच्या पिढीला संस्कारी बनविण्याचे काम सुद्धा महिलाच करते. आजघडीला सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानास्पद असल्याचे पुंडगे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
संगीत खुर्ची या खेळात 40 महिलांनी सहभाग घेतला. यात सौ.स्वाती पंडित लाटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर सौ.विद्या विलास लाटे व सौ.आशा सुखदेव सुरवसे या अनुक्रमे द्वितीय व तृतीय बक्षिसांच्या मानकरी ठरल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दी डाके यांनी केले. संजीवनी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता डाके व प्रमिला गोरे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये विविध कला व कौशल्य अंगभूत आहेत. मात्र त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळाले पाहिजे. आता खेड्यातील महिला सुद्धा कुठेही कमी नाहीत हे दाखवून देण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे.
– संजीवनी राऊत ( जिल्हाध्यक्षा – बांधकाम कामगार संघटना,बीड)