मुंबई: मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे पूर्व व पश्चिम उपनगरातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. स्वप्ननगरी मुंबई स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला असून सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई स्वच्छ, सुंदर दिसण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत भिंती सुशोभित करणे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वीस हजार शौचालये बांधणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.