Russia Ukraine war : युक्रेनच्या बुचा शहरात मृतदेहांचा खच

 

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन (Russia Ukraine war) युद्धाच्या 40 व्या दिवशी काही भागातून रशियन फौजा कीव्ह आणि आसपासच्या परिसरातून मागे हटत असल्या, तरी युक्रेनच्या शहरांतील मृतदेहांची संख्या वाढतच चालली आहे. युक्रेनच्या बुचा शहरात 400 हून अधिक मृतदेहांचा खच रस्त्यावर पडला असून, युक्रेनने रशियावर नरसंहाराचा आरोप केला आहे. दरम्यान, आतापर्यंत युद्धात रशियाने 1,417 सर्वसामान्य युक्रेनी नागरिकांना मारल्याची माहिती संयुक्‍त राष्ट्रांच्या मानवाधिकार यंत्रणेने दिली आहे. या युद्धात 2,038 नागरिक जखमीही झाले आहेत.

45 फूट लांब कबर

राजधानी कीव्हपासून जवळच असलेल्या बुचा शहरात युक्रेनी नागरिकांचे मृतदेह पुरण्यासाठी 45 फूट लांबीची एक कबर खोदली गेली आहे. त्यातच या मृतदेहांचे सामुदायिक दफन केले जात आहे. सेंट अँड्र्यू आणि पायरव्होज्वनोहो ऑल सेंटस् या चर्चमध्ये ही 45 फूट लांबीची कबर आहे. खार्किव्हमध्ये रशियाच्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला. मायकोलाईव्ह शहरावर रशियाने पुन्हा क्षेपणास्त्रे डागली. एका व्यक्‍तीचा मृत्यू, तर पाचजण जखमी झाल्याची महापौर सेनकेव्हिच यांनी माहिती. मारियुपोल येथे दीड लाख नागरिक अडकले असून, मदत पोहोचवणे कठीण आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात झेलेन्स्कींचे आवाहन (Russia Ukraine war)

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात एका रेकॉर्डेड व्हिडीओच्या माध्यमातून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मदतीचे आणि पाठिंब्याचे आवाहन केले. संगीताच्या विरुद्धार्थी काय आहे? उद्ध्वस्त झालेल्या शहरांचा आवाज आणि मेलेले लोक. या शांततेच्या संगीताला आजच चांगल्या संगीताने भरून टाका. आम्हाला कशाही प्रकारे असेना का; पण मदत करा, असे झेलेन्स्की म्हणाले.

युक्रेनच्या 22 वर्षीय युवतीने पाडले रशियन जेट आणि हेलिकॉप्टर (Russia Ukraine war)

काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या विद्यापीठात शिकत असलेल्या एका 22 वर्षीय युवतीने या युद्धात युक्रेनच्या सैन्यात भाग घेऊन रशियाची दोन लढाऊ विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडले आहे. रशियन गुप्तचरांचा वावर सर्व ठिकाणी असल्याने या युवतीची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

इग्ला हे क्षेपणास्त्र युक्रेनने 1975 मध्ये बनवण्यास सुरवात केली होती. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या दुप्पट वेगाने 11 हजार फुटांवरील लक्ष्य भेद करू शकते. ही युवती विद्यापीठात इन्फ्रारेड सरफेस टू एअर मिसाईलचे म्हणजे इग्ला क्षेपणास्त्राबाबत प्रशिक्षण घेत होती. पण तिला जुजबी माहिती होती. पण त्याच माहितीच्या जोरावर ती आता युक्रेनच्या सैन्यातील प्रशिक्षित रॉकेट लाँचर बनली आहे. तिने क्षेपणास्त्र लाँच करण्यात मास्टरी मिळवली आहे. युक्रेनच्या संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार जमिनीवरून हवेत क्षेपणास्त्र चालविण्यात या युवतीचा हातखंडा आहे. त्यामुळेच रशियाला अजूनपर्यंत युक्रेनवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. दरम्यान, गत महिन्यात एलेना नावाच्या युक्रेनी महिलेने टोमॅटो आणि जार फेकून रशियाचे डोन पाडले होते.

Source link

Leave a Reply