भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची सुद्धा वर्णी लागली आहे.
लखानी हे प्रदेश कार्यकारिणीत सह कोषाध्यक्ष असतील. तर या बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्यांना सुद्धा संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली. तर या घडामोडींवर उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी चिमटा घेतला आहे.
व्याही अरूण लखानी सह कोषाध्यक्ष
भाजप प्रदेश कार्यकारिणीत खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी यांची वर्णी लागली आहे. त्यांना सह कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचे लग्न सारंग अरुण लखानी(Sarang Arun Lakhani) यांच्यासोबत निश्चित झाले आहे. सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि पुढे सुप्रिया सुळे यांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरूण लखानी हे आहेत. ते मूळचे नागपूरचे आहेत. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारी PPP प्रकल्पांसह इतर अनेक उद्योगात हा समूह आघाडीवर आहे.
प्रदेश पदाधिकारी निवडीतून दुसर्या फळीची बांधणी
भाजपकडून बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून नव्या टीमची घोषणा करण्यात आली. नवनाथ बन, निरंजन डावखरे, कृष्णराज महाडीक या युवा चेहऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी देण्यात आली. नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्ते पद, निरंजन डावखरे सरचिटणीस तर कृष्णराज महाडीक यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच पक्षातही युवकांना संधी देण्यात भाजपचा पुढाकार दिसून येत आहे.
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकार्यांची नेमणूक करावी असे ठरले होते. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.