…तर पानिपतचा इतिहास वेगळा असता!

इंदोर च्या होळकर घराण्याचे संस्थापक.घराणेशाहीचा कसलाही वारसा नसताना केवळ स्वकृत्व व पराक्रमाने पुढे येत मराठेशहीच्या राजगड्याचे एक चाक बनलेले धोरणी,मुत्सद्दी व झुंजार लढवय्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना इतिहासकारांनी दुर्लक्षितच केले. आज त्यांची पुण्यतिथी या निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा अल्पसा प्रयत्न…

दऱ्याखोऱ्यात, रानोमाळ भटकणे ज्यांच्या पाचवीला पुजलेले,अशा भटक्या विमुक्त समाजात धनगर कुटुंबात मल्हाररावांचा जन्म झाला.खंडोजी वीरकर चौगुला हे त्यांचे वडील. होळ या गावी त्यांचा मुक्काम पडलेला असतानाच दि.१६ मार्च १६९३ रोजी मल्हारराव यांचा जन्म झाला.या गावा मुळेच त्यांना होळकर नाव चिकटले.मल्हारराव लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले.मल्हारराव पोरके झाले. भाऊबंदकी चा त्रास वाढला;म्हणून मायलेकांनी मामाचा आश्रय घेतला. तळोदा येथील भोजराज बारगळ हे मल्हाररवांचे मामाश्री.मामाच्या आश्रयात वाढलेल्या मल्हाररवांनी दाभड्यांच्या सैन्यातील एक सरदार असणाऱ्या कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीत एक सामान्य शिपाई म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.मल्हार यांच्या अंगी असणारी नेतृत्व क्षमता ,साहस, मुत्सद्दीपणा, धाडस,पराक्रम या गुणामुळे लवकरच त्यांचे नाव झाले.थोरले बाजीराव पेशवे यांचे ही त्यांनी लक्ष वेधून घेतले.आपल्या अंगी असणाऱ्या नेतृत्व गुणांची कसोटी लावत त्यांनी उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्यास सुरुवात केली.याची बक्षिसी म्हणून १७२९ मध्ये माळव्याची सुभेदारी मिळाली.एक सामान्य शिपाई सुभेदार झाला! त्यांनी कारकिर्दीत कित्तेक लढाया केल्या.निजामाचा १७३७ मध्ये ताल भोपाळ येथे केलेला दणदणीत पराभव,१७३९ मध्ये पोर्तुगिजांकडून हिरावून घेतलेली वसई,१८४८ मध्ये रोहील्यांचा केलेला बीमोड या काही त्यांच्या गाजलेल्या लढाया.चार पेशव्यांची कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली.त्यांचे बहुतांश जीवन रणमैदान गाजवन्यातच गेले. म्हणूनच होळकरांना मराठेशहीचे एक चाक म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतात त्यांनी मराठ्यांचे चांगलेच प्रस्थ वाढवले. पराक्रमी मल्हाररावांचा उत्तरेत एवढा धाक होता की,’मल्हार आया….’ हा आवाज कानी पडताच अख्खे गाव चिडीचूप होत असे. होळकर व शिंदे या जोडगोळीच्या असामान्य पराक्रमामुळे च मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकला. दुर्दैवाने त्याचे श्रेय मात्र इतिहासकारांनी राघोबांना देण्यातच धन्यता मानली.

उत्तर हिंदुस्थान आपल्या घोड्यांच्या टापांखाली तूडवून काढणारे मल्हारराव व राणोजी शिंदे हे जिवलग मित्र! यांच्या पराक्रमामुळे पातशाही चे सर्व सरदार, वजीर दोघांना टरकून असत. अब्दालीच्या आक्रमणापासून मराठेच पातशाहीचे रक्षण करू शकतात, असा विश्‍वास पातशहाच्या मनात निर्माण झाला. अन् अब्दालीने केलेल्या तिसऱ्या स्वारीनंतर बिथरलेल्या पातशहाने आपल्या सफदरजंग या वजीरा मार्फत कन्नोज येथे होळकर – शिंदे यांच्याशी दिल्ली तख्ताच्या रक्षणाचा ऐतिहासिक करार केला. तो दिवस होता २७ मार्च १७५२. होळकर-शिंदे यांच्या पराक्रमाने प्रभावित झाल्यानेच पातशहाने हा करार केला होता.बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे एकाकी झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना त्यांच्या मदतीसाठी ससैन्य पाठवून मल्हाररावाने आपल्या विशाल हृदयाचे दर्शन घडवले. मराठेशाही साठी आपल्या हाडांची काडं अन् रक्ताचं पाणी करनाऱ्या या महान योध्दयाची इतिहासाने उपेक्षाच केली.

पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला असला तरी मल्हाररावांनी पुन्हा सैन्य गोळा करून मोहिमा सुरू केल्या व याची परिणती म्हणून उत्तरेतील मराठ्यांचा धाक कमी झाला नाही. काही काळाने उत्तर भारतात पुन्हा मराठ्यांचा झेंडा डौलाने फडकला. त्यात मल्हाररावांचे मोठे योगदान!
उल्लेखनीय बाब ही की पानिपतच्या युद्धा पूर्वीच १३ मार्च १७६० रोजी मल्हाराव होळकर यांनी अब्दालीशी तह करून त्यास परत पाठवायची तजवीज केली होती. मात्र, तोवर भाऊसाहेब पेशवे उत्तरेत असल्याचे समजले अन् नजीबाच्या आग्रहाखातर अब्दाली येथेच थांबला आणि पुढचा अनर्थ घडला. केवळ मराठ्यांच्या नशिबात विजय नव्हता म्हणूनच मल्हाररावांचा मुत्सद्दीपणा कामी आला नाही. नाही तर इतिहास काही वेगळाच राहिला असता! अशा मुत्सद्दी, पराक्रमी, झुंजार लढवय्या सुभेदार श्री मल्हारराव होळकर यांची आज पुण्यतिथी.या निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस महा जागरण परिवाराकडून मानाचा मुजरा…!

अशोक दोडताले 

Leave a Reply