जालन्याच्या भक्तानं विठुरायाला नेसवलं सव्वा दोन कोटींचं धोतर!

पंढरपूर: पंढरीचा पांडुरंग हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातील कोट्यावधी भक्तांचं आराध्य दैवत आहे. आषाढी कार्तिकी ची वारीची परंपरा असणारे लाखो भक्त महाराष्ट्रात आहेत.महाराष्ट्रात दरमहा वारीची परंपरा असणारी असंख्य कुटुंबे आहेत.विठुराया आणि भक्तांचं असलेल्या अवीट नात्याबद्दल कितीही बोललं तरी कमी ठरणार नाही. विठुरायाचा आशीर्वाद लाभल्यामुळे भरुन पावलेले भक्त सढळ हातांनी आणि खुल्या मनाने दानधर्मही करतात. विठुराया गोरगरिबांचा देव म्हणून ओळखला जात असला तरी त्याचे काही भक्त मात्र कुबेर आहेत. हे वेळोवेळी दिसून येते.

 

विठुरायाला सव्वा दोन कोटींचे दान

उजव्या हाताने दान केलं तर ते डाव्या हाताला ही कळू नये, असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय आज पंढरपुरात आला.आज विठ्ठलाच्या जालन्याच्या एका भक्ताने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर गुप्त दान केलं आहे. या भक्ताने आपल्या विठुरायाला सोन्याचे धोतर नेसवलं असून, चंदनाचा हार आणि कंठी ही दान केली आहे. या गुप्त दानची किंमत तब्बल सव्वा दोन कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलं.

 

या पूर्वी ही दिलं होतं १ कोटी ८० लाख रुपयांचे दान

उल्लेखनीय म्हणजे गुप्त दान करणाऱ्या जालन्याच्या या भाविकाने याआधी नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांचे दान केलं होतं. त्यानंतर पुन्हा सव्वा दोन कोटी रुपयांचं गुप्त दान या भक्ताकडून करण्यात आलं आहे.

 

सव्वा कोटी रुपयांच्या दानमुळे गरिबांचा देव असणाऱ्या विठुरायाची श्रीमंती आणखी वाढली आहे. कारण विठ्ठलाच्या खजिन्यात एकाच भक्ताकडून सुमारे तीन कोटींचे दान मिळाले आहे.

Leave a Reply