मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या ८ ग्राहकांवर गुन्हा दाखल
माजलगांव( प्रतिनिधी):-शहरात मागील अनेक दिवसांपासून वीजचोरीचे प्रकार वाढल्यामुळे वीज वितरण कंपनीने मीटरमधून होत असलेल्या चोरी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी मीटरिंग बॉक्स बसवले . यामुळे मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या तेरापैकी आठ जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला .
माजलगांव शहरात वीज वितरण कंपनीचे ८ हजार ग्राहक आहेत . यापैकी बहुतांश ग्राहक मीटरमध्ये छेडछाड किंवा बायपास करून वीज चोरत असतात. परिणामी , वीज वितरण कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे . वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता सी . एम . चौधरी यांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून शहरातील सिरसट गल्ली व गांधनपुरा भागात मागील आठ दिवसांपासून विजेच्या खांबावर मीटरिंग बॉक्स बसवून वीजचोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले . मागील आठ दिवसांत सिरसट गल्ली भागातील १३ ग्राहकांकडून वीजचोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला . त्यापैकी पाच जणांनी दंडासह रक्कम भरण्याचे मान्य केले यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ जणांवर शहर पोलिसात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला . या कारवाईमुळे वीजचोरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .
अशी तपासतात चोरी…
ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड किंवा बायपास केला आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या खांबावर मीटरिंग बॉक्स बसवून २४ तासांत जी रीडिंग येईल त्यावरून वीजचोरी लक्षात येते .
या ग्राहकांवर गुन्हा दाखल
अर्जुन जनार्दन निकम , कमलाकर गोविंदराव देशमुख , बाबूराव तुकाराम सावंत , कमलाबाई किसन भागवत , राजाभाऊ बाबूराव सिरसट , उत्तम अभुवा देशमुख व भिकू सखाराम पोपळे .
विज चोरी रोखण्याचे प्रयत्न…
शहरात जवळपास ७० टक्के वीजचोरी होत असल्याने ती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . ज्या भागात जास्त वीजचोरी होत असल्याची शंका आहे . त्या भागात केबल टाकण्यात येणार असून जागोजागी मीटरिंग बॉक्स बसवण्यात येऊन वीजचोरी रोखणार आहोत .
– सी . एम . चौधरी , उपविभागीय अभियंता