अभिनेते विक्रम गोखले यांची एक्झीट

 

पंधरा दिवसांपासुन सुरू असलेली झुंज संपली

पुणे, दी.२६(प्रतिनिधी): मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी ते ७६ वर्षांचे होते.

प्रकृती खालवल्याने गत पंधरा दिवसपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.अंत्यदर्शनासाठी त्यांचं शव बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात येणार आहे.आज संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील होते. वडीलांचे पावलावर पाऊल ठेवत विक्रम गोखले देखील अभिनय क्षेत्रात आले. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध प्रकारच्या मनोरंजन माध्यमात त्यांनी अभिनय केला. मराठी आणि पुढे हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नुकताच प्रदर्शित झालेला निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. नाना पाटेकर सोबत ‘नटसम्राट’ मध्ये त्यांनी केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.

Leave a Reply