डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या प्रयत्नाने वांगी येथील श्री संत नारायण बाबा देवस्थानला तीर्थक्षेत्र ‘ब’ चा दर्जा 

 डॉ.ओमप्रकाश शेटे यांचे ग्रामस्थांकडून आभार

 

माजलगाव,दि.१६ (प्रतिनिधी) :- माजलगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वांगी येथील श्री संत नारायण बाबा देवस्थानला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा प्राप्त झाला आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव का.गो.वळवी यांनी नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. भूमीपुत्र डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी मागील चार वर्षांपासून शासनदरबारी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून देवस्थान व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, माजलगाव तालुक्यात वांगी (बु.) येथे श्री संत नारायण बाबा संस्थान आहे. वारकऱ्यांची ‘धाकटी पंढरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पुण्यभूमीत दरवर्षी लाखो भाविकांची मांदियाळी भरते. येथील ५०० टाळकऱ्यांचा फिरता अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात एकमेवाद्वितीय आहे. या देवस्थान चा परिपूर्ण विकास व्हावा व भाविकांसाठी अधिकच्या सुविधा मिळाव्यात यासाठी संस्थानचे अध्यक्ष गुरुवर्य हभप एकनाथ माने महाराज मागच्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते.

वांगी चे माजी सरपंच गणेशराव रासवे, तत्कालीन ग्रामसेवक राजकुमार झगडे, कै. हभप भारत महाराज गरड यांनी ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र ‘ब’ चा प्रस्ताव सादर केला होता. मंत्रालयात विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष नाथबाबा यांनीही अथक परिश्रम घेतले होते. कार्यालयीन सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ओमप्रकाश शेटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

श्री संत नारायण बाबा देवस्थानला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिल्याबद्दल तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, विद्यमान ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन, डॉ.ओमप्रकाश शेटे, गणेशराव रासवे, सौ.संध्याताई दिपकराव जाधव, राजकुमार झगडे, आदींचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत या देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. त्यामुळे लवकरच हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या नकाशावर झळकणार आहे. मात्र देवस्थान विषयी तळमळ असलेले कै. भारत महाराज गरड हे वैभव पाहण्यासाठी आपल्यात नाहीत याची सर्वांना कायम हुरहूर राहील.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वांगी येथील श्री संत नारायण बाबा देवस्थानला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा देण्याबाबत जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु सरकार बदलल्याने मधल्या काळात याबाबतची प्रक्रिया थंडावली होती. मात्र देश, देव व धर्मासाठी काम करणाऱ्या ‘शिंदे -फडणवीस’ सरकारने देवस्थानला अग्रक्रम दिला आहे. संस्थानच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी लवकरच प्रशासकीय मीटिंग लावली जाईल.

            – डॉ.ओमप्रकाश शेटे

Leave a Reply