अब्दुल सत्तार यांच्याविरोधात षडयंत्र रचणारा ‘तो’ नेता कोण? वाचा खास रिपोर्ट…

नागपूर : कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी शिंदे गटातील नेत्या बाबत मोठा आरोप करुन राजकीय खळबळ उडवून दिली आहे. माझ्याच पक्षातील काही नेत्यांनी माझ्या विरूद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. परिणामी शिंदे गटातचं अंतर्गत कुरघोडी सुरु झाली का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. “माझ्यावरील आरोपांनंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे माझी बाजू मांडली आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातीलही काही लोक असू शकतात. मंत्रिपद न मिळालेल्या नेत्याचं माझ्याविरोधात षडयंत्र आहे. विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. आमच्या पक्षाच्या बैठकीतल्या काही बातम्या बाहेर येत आहे. काही दिवसांआधीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत काय झालं ते बाहेर आलं. याबाबत मी मुख्यमंत्री शिंदेंच्या कानावर घातलं असून मी चौकशीची मागणी केलीय”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

नागपुर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधी पक्षाकडून वाशिममध्ये गायरान जमिनीचा 150 कोटींचा घोटाळा आणि सिल्लोड इथल्या कृषी महोत्सवासाठी 15 कोटींच्या वसुलीचं दिलेलं टार्गेट असे दोन मोठे गंभीर आरोप झाले.या आरोपावरून आंदोलन करण्यात आले तसेच राजीनाम्याची मागणीही केली. यामुळे सत्तार यांना बॅफूटवर जावे लागले.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते बाहेर पडले आणि त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागली. पण मुलींचे टीईटी घोटाळा प्रकरण, गायरान जमीन आणि कृषी महोत्सवासाठीचे वसुलीचे आरोप अशाप्रकारे चोहोबाजूंनी सत्तारांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून होत असला तरी यामागे शिंदे गटातीलच एका असंतुष्ट नेत्याचा हात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

सदर नेता मंत्रीपदासाठी ताटकळलेला असून आपल्या गच्छंती ची वाट बघत आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. तो षडयंत्रकारी नेता कोण? असे त्यांना विचारले असता त्यांनी याबाबत खुलासा केला नाही.

Leave a Reply