विधानसभा अध्यक्षांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव; अजित पवार म्हणाले, ‘मला माहीत नाही’!

 

महाविकास आघाडीत फूट: सत्ताधारी

नागपूर: विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावरच दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. मात्र, या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या आमदारांनी स्पीकरविरोधात अविश्वास ठराव आणल्याबाबत अशी कोणतीही माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. मला या बद्दल माहिती असते तर मी त्या पत्रावर सही केली असती.अजित पवार पुढे म्हणाले, ‘मला स्पीकरविरोधातील अविश्वास प्रस्तावाची माहिती नाही. आज सकाळी 9 वाजता मी विधानसभेत गेलो आणि आता दुपारी 12 वाजता बाहेर पडतो. पवार पुढे म्हणाले, ‘माझ्या माहितीनुसार एक वर्षासाठी स्पीकरवर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. मला याबद्दल माहिती असते तर मी त्या पत्रावर सही केली असती. मला याबाबत कोणतीही माहिती नाही.

दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले…

आ.भास्कर जाधव म्हणतात…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दुर्देवाने आणावा लागला. कारण त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांची भूमिका सत्ताधारी पक्षाच्या बाजुने राहिली आहे.

आम्हीही गेली ३० वर्ष या सभागृहाचे सदस्य आहोत. त्यामुळे असे पक्षपाती निर्णय झाले, तर विरोधीपक्षाच्या हातात दुसरा पर्याय नसतो. अध्यक्षांविरोधात बोलायचं नाही. बोललं तर जयंत पाटील यांच्यासारखी कारवाई होणार, आमदारांना निलंबित करणार, दादागिरीने सभागृह चालवणार, मग विरोधीपक्षाने काय करायचं? विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा द्यायचा? त्यांनी त्यांची भूमिका कशी पार पाडायची? असेही ते म्हणाले.

अविश्वास प्रस्तावावर ३९ आमदारांची सही आहे आणि विरोधी पक्षात १२५ आमदार आहेत. त्यामुळे असा प्रस्ताव दाखल करताना सर्वांनीची स्वाक्षरी घेणं गरजेचं नाही. ज्यावेळी हा प्रस्ताव चर्चेला येईल, तेव्हा आम्ही सर्व एकसंघ दिसू, असे ते म्हणाले.

Leave a Reply