शाळकरी मुलांच्या सुदृढ आरोग्य व चिंतामुक्त जीवनासाठी उपाय…

तुम्ही शाळकरी मुलांचे पालक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे

शाळकरी मुलांचे अनारोग्य ही गंभीर समस्या हल्ली शाळाशाळां मधून दिसून येत आहे. विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक गटातल्या विद्यार्थ्यांत ती प्रकर्षाने दिसून येत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून शिक्षव्यवस्थेतील घटकांकडून शाळकरी मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे आवश्यक ते लक्ष देण्यात आले. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलां मुलांमध्ये अभ्यासाची जीवघेणी स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. मुले ज्ञानसंपादनाच्या या स्पर्धेत रात्रं-दिवस एक करून मन लाऊन अभ्यास करू लागली. या जीव घेण्या स्पर्धेत मात्र शाळकरी मुलांचे आरोग्य मात्र हरवले. सुदृढ आरोग्य जपणे आणि जोपासणे हा विचारच ही पिढी विसरून गेली. त्यातूनच बालकांच्या नाना समस्या कमी अधिक प्रमाणात दिसू लागल्या. खरंतर सर्वच शाळकरी विद्यार्थ्यांच्या वयोगटात बालकांच्या आरोग्यविषयक या समस्या पाहायला मिळू लागल्या.

शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे केंद्र होय. पण आधुनिक शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनासाठीचे व्यस्त जीवन यामध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. याला केवळ पालक जबाबदार नाहीत;तर शिक्षक,समाज आणि स्वतः विद्यार्थीच जबाबदार असल्याचे दिसून येते. हल्ली शाळा शाळतून नेहमीच विद्यार्थी आजारी असल्याचे पाहायला मिळते. मुलांना चक्कर येणे,उलटी होणे, थकवा येणे, अंग गळून जाणे,हा प्रकार हल्ली अनेक शाळांमधून कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याची खोलवर कारणे शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना व्हावी असे मनोमन वाटते.

मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पण त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न मात्र काही नाममात्र दक्ष पालकांकडून, शिक्षकांकडूनच केले जातात. सामान्यपणे अधिकांश पालक वर्गामध्ये मुलांच्या आहाराबाबत पर्यायाने आरोग्याबाबत आवश्यक ते गांभीर्य दिसत नाही. खरंतर केवळ पालकावरच ही जबाबदारी नाही; तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत संपूर्ण शिक्षण यंत्रणेने च गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. नव्हे ती आता बदलत्या काळाची गरज आहे. कोरोना मुळे आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक राहायला हवे हे आपल्याला बदलत्या काळाने सुचवले आहे.

मागच्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य व चिंतामुक्त जीवन या विषयावर मी चिंतन केले आहे. याबाबत अनेक विद्यार्थ्यांशी,पालकांशी मी संवादही साधला आहे. तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या. त्यामधील काही चांगल्या तर काही विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या.

मुले शाळेला निघण्यापूर्वी काहीही न खाता घरातून बाहेर पडतात. शाळा जर सकाळ सत्रात असेल तर तब्बल सहा-सात घंटे उपाशीच राहतात. दुपार सत्रात उष्णता सामान्य पणे अधिक जाणवते. पण दररोज लक्ष करून विद्यार्थी शाळेला पाणी बॉटल घेऊन जातातच असे नाही.अन् पालक ही या बाबत त्यांना शाळेला पाणी बॉटल घेऊन जाण्यासाठी आग्रह करतातच असेही नाही. शाळेत वेळच्या वेळी मुले पाणी पितातच असेही नाही. तर अनेक मुले पाणी बॉटल पाणी न पिता घरी भरलेली बॉटल घेऊन येतात.अशी अनेक मुले अन् पालक माझ्याशी बोलताना प्रामाणिकपणे व्यक्त झाली. आणि म्हणूनच शालेय मुलांचे आरोग्य व काळजी या विषयावर मी चिकित्सक विचार केला तेंव्हा अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्याचा आपण गांभीर्याने कधी फारसा विचारच केला नाही.

अशा या छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींवर मी विचार केला,चिंतन केले.

मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहाराची व्यवस्था असताना विद्यार्थ्यांकडून त्याचे सेवन न करता किराणा दुकानावर अडकवलेल्या खाद्यपदार्थांचे मुले मोठ्या आवडीने सेवन करतात. जे खाद्यपदार्थ अनेक दिवसांपासून सीलबंद केलेले असतात. अशा रंगीबेरंगी पुड्यातील अशुद्ध तेलाचा वापर करून बनवलेले खाद्यपदार्थ जे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात.अशा खाद्यपदार्थांचे सेवन करण्याचे आकर्षण मुलांमध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वत्र दिसून येते. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्वे,कर्बोदके,प्रथिने कॅल्शियम आणि इतर आवश्यक ते घटक घरच्या जेवणात अर्थात पोळी भाजी,भात,लोणचे,कोशिंबीर, तूप,वरण,पापड, डाळी,दूध,ताक,दही पनीर, भाकरी,लोणचे,यामधून मिळत असतात. असे सात्विक अन्न मुलांचे नावडते का असेल? हेच कळत नाही. पॉपकॉर्न,चीप्स, बिस्किटे,चॉकलेट्स किंवा तत्सम अनेक दिवस पॉकेटमध्ये बंद असलेल्या खाद्यपदार्थांचे तसेच पाणीपुरी,भेळपुरी,पिझ्झा ,बर्गर, इत्यादी तसेच स्ट्रीट फूडच्या नावाखाली तयार होत असलेले असंख्य खाद्यपदार्थ या मुलांना का आवडतात.याचे निश्चित कारण कळत नाही. पण हे सर्व खाद्य पदार्थआरोग्यास अपायकारक आहेत.हे मुलांना समजावण्यास पालक शिक्षक आणि समाज अयशस्वी ठरत आहे ,असे प्रकर्षाने दिसून येते.

प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी अथवा वर्ग सुरू असताना चक्कर येऊन मुले पडण्याची प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची शरीरप्रकृती नाजूक दिसून येत आहे. हता पायांची हाडे वर आलेले,, पोट खपाटीला गेलेले, डोळे खोल खोल गेलेले,चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसणे,शरीराला जणू त्वचेचा कागदच चिकटलेला आहे अशी काटकुळी तब्येत असलेली ही पौंगड आणि तरुण वयातील मुले पाहिल्यानंतर मन हेलवते. कधी धष्टपुष्ट होतील ही मुले?असा प्रश्न पडतो.

आजवर शिक्षण क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे झाली. अभ्यासक्रम कठीण असावा की सोपा यावर अनेक चर्चा सत्रे, परिसंवाद घडून आले. विद्यार्थ्यांना पेलणारा, रुचणारा, पचणारा आणि घडवणारा अभ्यासक्रम असावा याबाबत प्रसंगी अनेक समित्याही स्थापन झाल्या. त्या समित्यानी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता तपासून सोपी अभ्यासक्रम पद्धती असावी अशा शिफारशीही केल्या. त्या धरतीवर इयत्ता पहिली ते दहावी महाराष्ट्र बोर्डाने त्या त्या इयत्ते नुसार सोपी आन आनंददायी शिक्षण पद्धत लागूही केली. पण बौद्धिक क्षमतेचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतांचा विचार तितकासा न झाल्याचे आजही पाहायला मिळतेय.

शालेय पोषण आहारात आवश्यक ते बदल करून अधिक पोषण घटक असणारा आहार विद्यार्थ्यांना पुरवून, त्यांची हाडे,मांस,मज्जा, इत्यादी बळकट करून रक्त वाढीसाठी व एकूणच विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन व संरक्षणासाठी प्रयत्न व्हायला हवेत. नव्हे आता ती काळाची गरजच बनलेली आहे.पालक या शब्दाचा अर्थ आहे पालन पोषण करणे. पण विद्यार्थ्याला केवळ यंत्रवत राबवून शाळा, ट्युशन,व्यक्तिमत्व वर्ग, हस्ताक्षर वर्ग यासारख्या असंख्य क्लासेसच्या तसेच शाळेच्या अभ्यासाच्या ओझ्याने ताण तनावाने ही मुले अगदी दबून गेली आहेत. त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद कुठे हरवून गेलाय कुणास ठाऊक. या विद्यार्थ्यांचे हल्ली शाळेतही लक्ष नसते. ट्युशन मध्येही लक्ष लागत नाही. त्याची कारणेही तशीच आहेत. शाळेचे सहा ते सात तास, ट्युशनचे तीन-चार तास संगीताचा एखाद-दुसरा तास हस्ताक्षर वर्गाचा एखादा तास या सगळ्यात पिळवटून गेलेल्या त्या मुलाकडून अभ्यासाची अपेक्षा तरी पुन्हा कशी करावी.त्याची चिडचिड दिवसेंदिवस वाढू लागते. तो अगदी थकून जातो.शाळेत शिकवलेले त्याच्या लक्षात राहत नाही. होमवर्कच्या क्लास वर्कच्या धाकाने ते मुल जेवणसुद्धा वेळेवर करत नाही. त्याचं जेवणात मन लागत नाही. जेवणातली रुची हरवलेले ते मुल केवळ भूक शमवण्यासाठी आणि पालकांच्या समाधानासाठी दोन घास पोटात ढकलते. पुढे त्याची चिडचिड दिवसेंदिवस वाढतच जाते. त्यातून एकलकोंडी राहणे, घरातल्या कुणाशीही न बोलणे,मित्र-मैत्रिणींपासून दूर राहणे,त्यांच्याशी अबोला धरणे,पटकन चिडणे ,कोणत्याही गोष्टीत मन न रमणे, सतत उदास राहणे,थोरामोठ्यांना माघारी बोलणे अशी अनेक लक्षणे त्यात दिसू लागतात .

परिणामतः जीवापाड प्रेम असणारे आपले मुल आपल्या हाताबाहेर जाते की काय याची भीती पालकांना सताऊ लागते. म्हणूनच आहाराच्या बाबतीत शाळेत शिक्षकांनी आणि घरी पालकांनी दक्ष असायला हवे. तरच पुढची पिढी सुदृढ निपजेल. नसता हुशार,अभ्यासू पिढी घडवण्याच्या नादात कुपोषित आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल पिढी तर निर्माण होणार नाही ?याचीच नेहमी भीती वाटते.

-माधव अरुणराव डाके

राजस्थानी माध्यमिक विद्यालय, सहयोगनगर बीड.

मो 9730115620

Leave a Reply