आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ‘एवढी’ पदे भरणार – आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

पुणे, दी.९ (प्रतिनिधी): आयुष्यमान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात 1 हजार 406 समुदाय व आरोग्य अधिकारी यांची पदे रिक्त होती. त्यानुसार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, असे मत पुणे येथे आरोग्य सेवेचा आढावा घेताना आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी यांनी व्यक्त केले.

 

केंद्र शासनाने डिसेंबर 2022 पर्यंत 10 हजार 356 आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्याला दिलेले आहेत. राज्याने आतापर्यंत 8 हजार 330 उपकेंद्र, 1 हजार 862 प्राथमिक आरोग्य केंद्र व 582 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, असे 10 हजार 774 आरोग्य केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यान्वित केले आहेत.

 

राज्यातील उपकेंद्राद्वारे 5 हजार लोकसंख्येला आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. या केंद्रामध्ये तेरा प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रसुती पूर्व, प्रसूती सेवा नवजात बालकांना सेवा, बाल व किशोरवयीन आजार व लसीकरण, कुटुंब नियोजन गर्भनिरोधक आवश्यक सेवा, सामान्य रोगाची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन, असंसर्गजन्य रोग व तपासणी, मानसिक आरोग्य नियोजन, कान-नाक-घसा-डोळे व सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत मुखरोग आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग अशा सेवांचा यात समावेश आहे.

या प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आयुर्वेदिक, युनानी, बीएससी नर्सिंग पदवीधारक नियुक्त केले जात आहेत व त्यांच्याद्वारे या सुविधा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

 

राज्यातील अशा रिक्त ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची उपकेंद्राच्या ठिकाणी नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या कारणास्तव राज्यातील उपकेंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठी या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात येत आहे, असे सहसंचालक डॉ. विजय कांदेवाड यांनी सांगितले.

 

सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रातील रिक्त पदे भरली जातील व सामान्य माणसाला आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल, यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल, असे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply