डॉक्टरकीचे धडे गिरवा आता मायबोली मराठीत!

मुंबई,(महा जागरण टीम):

माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

– संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर महाराजांनी वरील शब्दात मराठीची महती वर्णन करताना मराठीची तुलना अमृताशी केली आहे. परंतु मराठी भाषिकांनीच व्यवहारात मराठीचा वापर कमी केल्याने अशा महान भाषेची आज पिछेहाट होताना दिसत आहे.मराठी माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी भाषेत कच्चे असतात. त्यामुळे असे विद्यार्थी प्रामुख्याने इंग्रजी भाषेत असणाऱ्या वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे टाळून कला शाखेकडे वळतात. राज्यातील अशा विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता डॉक्टरकीचे धडे सुद्धा मायबोली मराठीतून गिरवता येणार आहेत.

 

मध्य प्रदेश सरकारने नुकतेच वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यानंतर आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.यासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, एमबीबीएसचा अभ्यासक्रम इंग्रजित असल्याने अनेकांना हा कोर्स पूर्ण करणे अवघड जात होते. मात्र आता हा अभ्यासक्रम आपल्या मायबोली मराठीत येणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय पॅनेलचे प्रमुख वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले हे असणार आहेत. या समितीची पहिली बैठक लवकरच मुंबईत होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील.

राज्यात एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये पुढील काळात मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला जाईल. इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तकं मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

दरम्यान, मराठी माध्यमातील आणि विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा इंग्रजीतून वैद्यकीय शिक्षण घेताना अडचणी येतात. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो. यामुळे स्पर्धेच्या युगात असे विद्यार्थी मागे राहण्याची भिती असते. पण आता मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार असल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा व्यवसायिक अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागणार नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे फायद्या बरोबरच मराठी भाषेचे महत्त्व वाढण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply