विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व जपावे – डॉ.ओमप्रकाश शेटे

दिंद्रूड येथे देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव

दिंद्रुड दि. 18 (प्रतिनिधी) :- नुकतेच इयत्ता दहावी, बारावी व नीट परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने ‘ॐ साईशिल्प’ येथे संपन्न झाला. वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व जपावे व उपेक्षित घटकांना आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असा मौलिक सल्ला देवदूत डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या भाषणात दिला.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शिल्पा ओमप्रकाश शेटे होत्या. सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीभाऊ रांजवण पाटील, सिद्धेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश गटकळ, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्क प्रमूख अनिल महाजन, उद्योजक तथा व्यंकटेश पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रदीप ठोंबरे, सरपंच भगवानराव कांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे सहाय्यक सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


यावेळी दिंद्रुड पंचक्रोशीतील ऋषिकेश सुंदर कटारे, ऋषिकेश विष्णुपंत तिडके, प्रतीक वैजनाथ वनवे, वैष्णवी अमरनाथ गवरकर, बसवलिंग देवराव पत्रावळे, तुषार जगन्नाथ वनवे या नीट परीक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सोबतच इयत्ता दहावी परीक्षेत 90 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला. बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी प्रा.डॉ. रमेश गटकळ पत्रकार अनिल महाजन, अशोक नावंदे, बळीराम पारेकर, डॉ.विष्णू तिडके यांची समायोजित भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांसोबतच गावाचा व पंचक्रोशी चा मानसन्मान वाढवला आहे. सत्कारातून सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळते, म्हणून विद्यार्थ्यांचा गौरव करणारे सन्मान सोहळे ठिकठिकाणी झाले पाहिजेत असे उद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.शिल्पा शेटे यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू खांडेकर यांनी केले.


आज-काल समाजामध्ये आत्मकेंद्रीय भरती वाढत असून सामाजिक जाणीव बोथट होत आहेत. सामाजिक व लोकहिताची कामे करण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नसल्याची खंत डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केली. स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रचंड धावपळ करताना लोक स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. कुटुंब, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडे सुद्धा पाहायला अनेकांना वेळ नाही. मात्र अशा व्यक्ती सुखी आणि समाधानी राहु शकत नाहीत. त्यामुळे इतरांच्या सुखात आपले सुख शोधले पाहिजे. आजचे गुणवंत हे देशाचे भविष्य आहेत. उद्या तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा, परंतु आपण ज्या समाजातून व ज्या घटकातून आलो त्यांना आयुष्यात कधीही विसरू नका. आयुष्याच्या शेवटपर्यंत सामाजिक दायित्व जपा असा सल्लाही डॉ.शेटे यांनी दिला.शेकडो पालक व मातांच्या उपस्थितीत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.


■ पतीच्या निधना नंतर तिन मुलांना बनवले डॉक्टर

दिंद्रूड येथील अल्पभूधारक शेतकरी सुंदर कटारे यांच्या निधना नंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सविता कटारे यांनी मोठ्या हिमतीने व कष्टाने तिन मुलांना डॉक्टर बनवले. आज त्यांचा मोठा मुलगा गणेश हा मुंबईत एबीबीएस च्या चौथ्या वर्षात शिकत आहे तर मुलगी कु. कोमल ही परभणी येथे पशु वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांचा तिसरा मुलगा ऋषिकेश याने यावर्षी नीट परीक्षेत 652 गुण मिळवले असून तो सुद्धा एबीबीएस साठी पात्र झाला आहे. या तिघांनाही चुलता सोपान कटारे यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात आदर्श माता म्हणून श्रीमती कटारे यांचा साडीचोळी देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply