गोरगरिब रुग्णांचा ‘देवदूत’ मुंबईच्या दवाखान्यात धावला…

डॉ.ओमप्रकाश शेटेंची चिमुकलीच्या उपचारासाठी धडपड

माजलगाव, दि.८ (प्रतिनिधी) : – देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून अद्वितीय काम करणारे ओमप्रकाश शेटे यांची संपूर्ण महाराष्ट्रात देवदूत म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पदावर नसतांनाही हा संवेदनशील माणूस सर्वसामान्य व गरजू रुग्णांच्या मदतीला धावून जातो. आजही अनेकांना जीवनदान देण्यासाठी शेटे हे अग्रणी असतात, याचा प्रत्यय वारंवार येतो.

माजलगाव चे पत्रकार दिलीप झगडे यांच्या परभणी जिल्ह्यातील नातेवाईकांचे एक वर्षाचे बाळ गंभीर आजाराने अत्यवस्थ आहे. बालकाच्या पित्याची आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी तगमग चालू आहे. मात्र या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सात लाख रुपये लागतील असे अंदाजपत्रक मुंबईतील एका हॉस्पिटलने दिले आहे. सलूनचा व्यवसाय करुन कुटुंबाची गुजराण करणाऱ्या रवी पितांबरे यांच्यासाठी एवढी रक्कम जमवणे अशक्य होते. खिशात सात हजार रुपये नसलेल्या या भूमिहीन कारागिराने एवढे पैसे आणायचे कोठून हा यक्षप्रश्न होता. कोठूनतरी मदत होईल या आशेवर आगतिक बापाने अनेक उंबरठे झिजवले, मात्र मदत मिळाली नाही.

कु. धनश्री पितांबरे या एक वर्षाच्या बाळाला घेऊन तिच्या पित्याने मुंबईचे तीन चार हॉस्पिटल पालथे घातले. परंतु प्रत्येक हॉस्पिटल मधून बाळाच्या ऑपरेशन साठी नकारघंटा येत होती. हताश झालेल्या धनश्रीच्या वडिलांनी अखेर गुडघे टेकले. एक शेवटची आशा म्हणून दिलीप झगडे यांनी ओमप्रकाश शेटे यांना फोन करुन सर्व हकीगत सांगितली. त्यांनी लागलीच बाळाच्या कुटुंबाला रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था केली.

हॉस्पिटलने सात लाख रुपयांचा खर्च सांगितला व तसे अंदाजपत्रक सुद्धा दिले. ओमप्रकाश शेटे यावेळी सह्याद्री या शासकीय अतिथी गृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत होते. त्यांनी मुलीच्या पालकांस तिथेच बोलावून धर्मादाय कोठ्यातून सदर बालिकेवर उपचार करण्यासाठी पत्र दिले. तसेच चिमुकलीची तब्येत गंभीर असल्याने ही बाब धर्मादाय आयुक्तांच्या कानावर घातली. तरीही उडवाउडवीची उत्तरे देत ऐनवेळी रुग्णालय प्रशासनाने ऑपरेशन साठी नकार दिला.

रुग्णालय उपचार करत नाही हे समजताच स्वतः ओमप्रकाश शेटे यांनी थेट रुग्णालयात धाव घेतली. आयुक्तांनी सोबत धर्मादाय इन्स्पेक्टर यांना पाठवले. बालिकेचा जीव धोक्यात असूनसुद्धा रुग्णालय प्रशासन ऑपरेशन का करत नाही? असा जाब विचारला व कायदेशीर कारवाईस तयार राहण्याची तंबी दिली. शेटे यांचा रुद्रावतार पाहून हॉस्पिटलने ऑपरेशनसाठी ताबडतोब होकार दिला आणि बाळाला लागलीच भरती करुन घेतले. बालकांसाठी असलेल्या मुंबईतील

पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु झाल्याने धनश्रीच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहु लागल्या. त्या अश्रूच्या प्रत्येक थेंबातून कृतज्ञता व्यक्त होत होती.

कसं होऊ उतराई….

 उपचारासाठी अनेक योजना असल्याची माहीती अनेकांनी दिली. मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी कित्येकजनांना भेटलो, फोन लावले. परंतु उपचार मिळण्याऐवजी माझी फरफटच जास्त झाली. मात्र केवळ एका फोनवर ओमप्रकाश शेटे यांनी मला मदत तर केलीच पण सपत्नीक दवाखान्यात धावून आले. या संवेदनशील माणसाचे उपकार कसे फेडावेत हेच समजत नाही.

                – रवी पीतांबरे (बोरवंड, ता.जि.परभणी)

Leave a Reply