महादेव जानकरांना आला शरद पवारांचा पुळका!

एकेकाळी होते कट्टर विरोधक

पुणे: शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले किंबहुना शरद पवार यांना विरोध केल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेले रासपा नेते महादेव जानकर हे मागील काही दिवसांपासून शरद पवार यांची स्तुती करताना दिसून येत आहेत. जानकरांनी घेतलेल्या या यू (U Tern) टर्न मुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

महादेव जानकर हे धनगर समाज चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. शरद पवार यांच्यामुळेच धनगर समाजाचं राजकीय, आर्थिक, सामाजिक नुकसान झालेलं असुन शरद पवारांना राजकारणातून संपविल्याशिवाय धनगर समाजाचा विकास होणार नाही. अशा प्रकारची भूमिका महादेव जानकर यांच्याकडून सातत्याने मांडण्यात येत होती. ‘महाराष्ट्राला बारामतीची भानामती झाली आहे;ही भानामती जानकर नावाचा जादूगार संपवणार!’ अशा वल्गना महादेव जानकर करत असायचे. पवार फॅमिलीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरूद्ध भाजपाच्या मदतीने निवडणूक लढवली होती. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाच्या मतांची संख्या मोठी असल्याने आपण सहज निवडून येऊ, असा विश्वास त्यांना होता. परंतु, तेथील स्थानिक धनगर समाजाने जानकरांना अपेक्षित साथ दिली नाही. परिणामी जानकर सपशेल आपटले. याचं बक्षीस म्हणून भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी देत मंत्री केले. मंत्री पदाची टर्म संपल्या पासून जानकरांचा भाजपाशी दुरावा वाढत गेला आहे. पूर्वी प्रत्येक स्टेटमेंट मध्ये शरद पवारांवर अत्यंत जहाल भाषेत टीका करणारे महादेव जानकर आता शरद पवार यांच्या विषयी मवाळ झाले असून त्यांच्यावर स्तुती सुमने उधळताना दिसून येत आहेत.

 

महादेव जानकर यांनी यांची ही बदललेली भूमिका पाहून धनगर समाजासह त्यांच्या समर्थकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होताना दिसून येत आहे. ज्या पवाराविरुद्ध टीका करण्यात उभे आयुष्य खर्च केले त्याच शरद पवारांची स्तुती करण्याची वेळ जानकरांवर का आली? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

काय म्हणाले जानकर…?

महाराष्ट्र भूमीसाठी राजकारणात सक्रीय राहण्याचे केले आवाहन !

शरद पवार यांना राजकारणात राहण्याचा सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. मात्र, पवारसाहेबांची देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गरज असल्यामुळे त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भूमीतच रहावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे.

 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याविषयी प्रतिक्रिया देताना जानकर बोलत होते.ते पुढे बोलतांना म्हणाले, देशात जे काही १० ते १२ मोठे नेते आहेत. त्यामध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. अध्यक्ष कोणी व्हायचं हा शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल, पण शरद पवार यांनी राजकारणातून बाहेर जाणे, ही सर्वांसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रचंड विरोध केला जात आहे. त्यामुळे पवार राजकारणातून बाहेर पडतील असे मला वाटत नाही.पवारसाहेबांनी डोळे वटारल्यास अजित पवार त्यांचा आदेश मानणार नाहीत, असे होणार नसल्याचे जानकर यांनी सांगितले.

महादेव जानकर यांनी काही दिवसापासून असा यू टर्न का घेतला, याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

 

बातमी मागील बातमी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अवश्य जॉईन व्हा लिंक https://chat.whatsapp.com/EtVPNaxyHO7Lr7mw1Ijrkv

Leave a Reply