महाराष्ट्राला देवी पावली!

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकला

नवी दिल्ली, दि. ३१ : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला.

 

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारी शक्ती’ वर आधारित होती.

महाराष्ट्राने ‘नारी शक्ती व साडे तीन शक्तिपीठा’चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून सादर केला होता. त्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंचलनात उपस्थितांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्त‍िमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविले गेले.

चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ॲड या संस्थेने चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरविले होते. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहिले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समूह, ठाणे येथील होते.

Leave a Reply