बीडच्या रोहन बहीरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ 

नवी दिल्ली :बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल त्याला ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, सचिव इंदिवर पांडे मंचावर उपस्थित होते.

 

याप्रसंगी देशभरातील 11 बालकांना सहा विविध श्रेणींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेख‍नीय कामगिरीसाठी ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. राज्यामधून बीड जिल्ह्यातील रोहन बहीर या बालकाला त्याने केलेल्या शौर्यासाठी गौरविण्यात आले. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे स्वरूप पदक, 1 लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.

 

रोहन याने असे वाचविले प्राण

 

बीड जिल्ह्यातील राजुरी नवगण येथील रोहन बहीर याने गावातील डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने वाचविले. रोहनच्या समय सूचकतेमुळे महिलेचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्यासाठी आज त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम (Innovation), शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांना मान्यता मिळाली, अशा 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची निवड करण्यात आली होती.

 

यावर्षी देशभरातून निवडलेल्या 11 मुला-मुलींना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रात (4), शौर्य (1), नवोपक्रम (2), समाजसेवा (2) अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Leave a Reply