कार्तिकी वारी निमीत्त आळंदीत ५ लाखाहून अधिक भाविक
आळंदी, दिं. २१(प्रतिनिधी):
इंद्रायणी काठी देवाची आळंदी l
लागली समाधी ज्ञानेशाची ll
संत ज्ञानेश्वर महाराज ७२६ वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारीसाठी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांनी तीर्थक्षेत्र आळंदीत उपस्थिती लावली. करोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वारी सोहळा होत असल्याने अलंकापुरीत एकादशीच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.अवघ्या पंचक्रोशीत चोहीकडे हरिनामाचा गजर सुरू आहे. ठिकठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. एकादशीच्या दिवशी राज्यभरातून आलेले पालखी सोहळे, दिंड्या, भाविक दिवसभर नगरप्रदक्षिणा करत असल्याचे दिसून आले. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली होती. माऊली…माऊली… पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम… निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम… ज्ञानोबा तुकोबा एकोबा… असा जयघोष ठिकठिकाणी ऐकू येत होता. डोक्यावर तुलसी घेतलेल्या महिला, गळ्यात वीणा, टाळ, पखवाज अडकवलेले भाविक सर्वत्र दिसत होते. सर्वांच्या मुखात हरिनाम होते. परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
इंद्रायणी काठी वैष्णवांची दाटी…
कार्तिकी एकादशीनिमित्त माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रविवारी पहाटेपासूनच स्नानासाठी इंद्रायणी घाटावर मोठी गर्दी झाली होती. कडाक्याच्या थंडीतही भाविक इंद्रायणीत डुबकी मारत होते. इंद्रायणीच्या दुतर्फा स्नानासाठी गर्दी झाली होती.