मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली संत काशिबा युवा विकास योजना

हा’ समाज अल्पसंख्य असला तरी दुधातील साखरेसारखे काम करतो: फडणवीस

सोलापूर: गुरव समाज हा देव, देश, धर्म मानणारा निसर्गपूजक, सामाजिक बांधिलकी जोपासणारा समाज आहे. गुरव समाजाचे समाजात मानाचे आणि आदराचे स्थान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर येथे केले.राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाजाच्या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले,’गुरव समाज मंदिरात स्वच्छता, पावित्र्य, मांगल्य ठेवतो.राज्य सरकार गुरव समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. ओ.बी.सी. महामंडळाच्या अंतर्गत संत काशिबा युवा विकास योजना सुरू करून त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रू.५०कोटींचे भांडवल देण्यात येईल व निधीची कमतरता पडू देणार नाही’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

गुरव समाज अल्पसंख्य असला तरी दुधातील साखरेसारखे काम करतो: देवेंद्र फडणवीस

गुरव समाज अल्पसंख्य असला तरी दुधातील साखरेसारखे काम करतो, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंदिरे, पूजास्थळे समाज परिवर्तन करण्याचे साधन असून, संस्कार रूजविण्याचे काम या ठिकाणी होत असते. वारकरी समाजाची मोठी परंपरा सांगणारा व हिंदू समाजाला जीवित ठेवण्याचे काम गुरव समाज करतो. ईश्वर सेवा व लोकप्रबोधनाचे कार्य हा समाज शतकानुशतके करत आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून हा समाज संघटित झाला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

डी. ए. कॉलेजच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महाअधिवेशनास महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, ज्ञानराज चौगुले, शहाजीबापू पाटील, राणा जगजीत सिंह, यशवंत माने आणि राजेंद्र राऊत, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे, डॉ. नितीन ढेपे, डॉ. मल्लिकार्जुन गुरव आदि उपस्थित होते.

Leave a Reply