ज्ञानदानाचे पवित्र कार्य हा शिक्षकांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा – डॉ.ओमप्रकाश शेटे

अंबादास राठोड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा 

दिंद्रुड (प्रतिनिधी) :- दिंद्रुड केंद्राचे केंद्रप्रमुख अंबादास राठोड या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलतांना डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी शिक्षक हा खऱ्या अर्थाने आदर्श पिढी घडवणारा शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार काढले. सेवेप्रति निष्ठावंत राहून राठोड यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाच त्यांच्या आयुष्याचा अनमोल ठेवा असल्याचेही ते म्हणाले.

अक्षरा मंगल कार्यालयात पार पडलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, संगम चे सरपंच भगवानराव कांदे, शेषराव गडदे (सरपंच मोरफळी), शेख तय्यब (सरपंच शिमरी पारगाव), सुभाष राठोड (सरपंच निपाणी टाकळी), कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईचे सभापती अशोकआबा डक यांनी राठोड यांना भेटून शुभेच्छा दिल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

अंबादास राठोड केवळ पाच महिन्यांचे असतांना त्यांच्या आई – वडिलांचे निधन झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शाळेत शिकवणी घेऊन त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी धारूर तालुक्यात 12 तर 25 वर्ष माजलगाव तालुक्यात अशी 37 वर्ष सेवा केली. दिंद्रुड येथे केंद्र प्रमुख पदावर कार्यरत असताना येत्या 30 एप्रिल रोजी राठोड सेवा निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमास माजलगाव व धारूर तालुक्यातील शिक्षकवृंद, विद्यार्थी, आप्तेष्ट, नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. राठोड यांच्या समवेत काम केलेल्या सहकारी शिक्षकांनी अनुभव व्यक्त करत शुभेच्छापर भाषणे केली. शिक्षण क्षेत्रात चोख कर्तव्य बजावणारे राठोड हे शांत व संयमी स्वभावामुळे सर्वांचे प्रिय असल्याचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

प्रास्ताविक मनोहर कटारे यांनी तर सूत्रसंचालन देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडूजी खांडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. आभार बोकण यांनी मानले.

Leave a Reply