पुरुषोत्तम मंदिराचा होणार जीर्णोद्धार!

विभागीय आयुक्त केंद्रेकर, आ. प्रकाश सोळंकेंनी पुरुषोत्तमपुरी येथे घेतले सपत्नीक दर्शन

माजलगांव (प्रतिनिधी):- तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील ऐतिहासिक प्राचीन मंदिर म्हणून ओळख असलेल्या पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या जिर्णोध्दरापुर्वी व मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत भगवान पुरोषोत्तमाची मूर्ती स्थलांतरित करण्यात येणार आहे.मूर्ती स्थलांतरित करण्यापूर्वी विधिवत अभिषेक करण्यात आला.ही विधिवत पूजा आ प्रकाश सोळंके सह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सपत्नीक केली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-(मुंडे) उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील केंद्रेकर म्हणाले,”मंदिराच्या विकास कामात कोणीही बाधा आणता कामा नये. गावाचं राजकारण बाजूला ठेवून मंदिराला सहकार्य करावे, कुठल्याही प्रकारची आडवा आडवी या कामात करू नये. गावातील मंदिराच्या परिसरातील जी अतिक्रमण ची जागा आहे त्या जागेच्या बदल्यात गावकऱ्यांना योग्य ती पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.” असे आदेश जिल्हाधिकारी मुधोळ यांना दिले व त्यांच्यासाठी घरकुलची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असेही आदेश सुनील केंद्रेकर यांनी दिले. मंदिर बांधकामाला पाणीच मिळेल नाही तर त्याची तक्रार विभागीय आयुक्तांना करण्याऐवजी गावातील लोकांनी त्या मंदिरासाठी पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, हे पहावे. असा चिमटा ही त्यांनी गावकऱ्यांना काढला व जिल्हाधिकारी तहसीलदार यांना या कामासाठी विशेष लक्ष देण्याची सूचना देखील केंद्रीकरांनी दिली. या कामासाठी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून या कामाच्या विकासासाठी तरतूद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी करून घेतली होती.

यावेळी बोलतांना आ सोळंके म्हणाले,”मंदिराचे काम दर्जेदार आणि कुठल्याही प्रकारच्या वादाशिवाय पूर्ण करण्याची जिम्मेदारी गावकऱ्यांची आहे.मंदिराच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यापूर्वी तिथल्या लोकांना पर्यायी जागा द्यावी,घरकुल मंजूर करावी किंवा इतर कुठल्या तरी योजनेतून त्यांना पर्याय उपलब्ध करावेत.” अशी विनंती आ. प्रकाश सोळंके यांनी प्रशासनाकडे केली.

Leave a Reply