पुणे: खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे. तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या ॲपच्या माध्यमातून समजते.
महाराष्ट्रात वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार कानावर येतात. दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं. त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.
भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं दामिनी ॲप तयार केले आहे. तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या ॲपच्या माध्यमातून समजते.
पण, हे दामिनी ॲप नेमकं काय आहे? ते कुठे उपलब्ध आहे आणि ते वापरायचं कसं? याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
‘वीज पडल्यामुळे दरवर्षी 2 हजार जणांचा मृत्यू’
जगभरात दरवर्षी 28 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय वीज सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षी या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना इंडियन मेटरॉजिकल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. ए. के. सहाय यांनी वीज पडण्याच्या संकटाचं गांभीर्य सांगताना म्हटलं की, “भारतात अलीकडच्या वर्षांत वीज पडून मृत्यू आणि नुकसान होण्याचं प्रमाण वाढत आहे. “वादळ आणि वीज पडणं ही भारतातील सर्वांत मोठी धोकादायक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामुळे दरवर्षी 2000 हून अधिक मृत्यू होतात.”
दामिनी ॲप काय आहे?
What is Damini app
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेनं 2020 मध्ये ‘दामिनी लाईटनिंग’ ॲप विकसित केलं आहे. संस्थेनं वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो , त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारं ठिकाण ओळखतो. हे ॲप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे ॲप देतं. तुम्ही जर वीज पडणार अशा क्षेत्रात असात तर काय खबरदारी घ्यायची याच्यासुद्धा सूचना या अॅपमध्ये दिल्या आहेत. आता हे ॲप कसं वापरायचं ते जाणून घेऊया.
असे वापरा दामिनी ॲप…
How to use Damini app
दामिनी ॲप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर ‘Damini : Lightning Alert’ असं सर्च करायचं आहे. हे ॲप डाऊनलोड केलं की जीपीएस लोकेशन ऑन ठेवण्यासाठी परवानगी द्यायची आहे. त्यानंतर हे ॲप तुमचं लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल. आणि मग तुमच्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता आहे की नाही ते सांगेल. या प्रक्रियेसोठी थोडा वेळ लागेल. वीज पडणार नसेल, तर No Lightning Warning किंवा बिजली की चेतावनी नही, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण जर वीज पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या 5 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, तर 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते आणि निळा रंग असेल, तर 10 ते 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. खबरदारीच्या सूचना
या ॲपवरील Instructions या पर्यायात तुम्ही जर वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची, याच्या सूचना दिल्या आहेत. या ॲपवरील Register या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथं नोंदणी करू शकता. नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, पिनकोड, व्यवसाय ही माहिती भरून तुम्ही या ॲपवर नोंदणी करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या भागात वीज पडण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते. जून-जुलैचा महिना लक्षात घेत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनांनी दामिनी ॲप वापरण्याचं आवाहन सर्वसामान्य जनतेला केलं आहे.
काय करावं,काय करू नये
Does and don’t
विजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा, खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो. सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही, तर उंचीच्या जागांखाली आश्रय घेणं टाळा. जसं की टेकडी, पर्वत यांच्याखाली आश्रय घेऊ नका.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं. कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात. पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेउन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीतकमी संपर्क येईल, याची खात्री करून घ्या.कार्यालयं, दुकानं, यांची दारं-खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा. विजा चमकत असतांना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास, त्वचेला मुंग्या किंवा झिणझिण्या आल्यास, तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा. धातुंच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा. धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा. टेलिफोन किंवा वीजेच्या खांबांखाली थांबू नका. ते विजेला आकर्षित करतात. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका. लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका. जर तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. सायकल, मोटरसायकल, उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा.
घरात असल्यास अशी घ्या खबरदारी
आता तुम्ही घरात असाल आणि हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी (जनावरांना चारणे, मासेमारीसाठी) बाहेर पडू नका. घरातचं थांबा आणि प्रवास टाळा. घराच्या खिडक्या, दारं यापासून लांब राहा. धातूच्या वस्तूंचा वापर करू नका. विजा चमकत असताना हेयरड्रायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझरसारखी विद्युत उपकरणे चालू करू नका. कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला वीजेचा धक्का बसू शकतो. टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरांवरील तारांमधून वाहू शकते. मुलं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खात्री करून घ्या. वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. उदाहरणार्थ-आंघोळ, भांडी धुणं वगैरे. कारण वीजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून वाहू शकतो. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा.
शेतकऱ्यांना आवाहन
दामिनी ॲपच्या वापरासंदर्भात कृषी विभागही स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांना आवाहन करताना दिसून येत आहे. कृषी विभागाच्या सूचनेनुसार “दामिनी ॲप शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी आहे. कारण वीज कुठे आणि किती वेळात पडणार याची पूर्वसूचना हे ॲप देत असतं. वीज पडण्याच्या 15 मिनिटे आधी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे संकेत हे ॲप देतं. त्यामुळे मग शेतात काम करत असलो तर बैल-बारदाणा घेऊन आपण सुरक्षित स्थळी जाऊ शकतो. “शेतकरी बांधव नियमितपणे शेतात काम करत असतात. त्यांच्या कामात ते व्यग्र असतात. अचानकपणे वीज पडते आणि अपघात होतात. हे टाळायचं असेल तर हे ॲप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करणं फार गरेजचं आहे. शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा”
वीज पडल्यानंतर…
एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता. असा स्पर्श करणं सुरक्षित असतं. बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना, हृदयाचे ठोके पडताहेत ना ते अगोदर तपासून पाहा. जर व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या. हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डिआक कॉम्प्रेशनचा वापर करा. अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाहा. गरज पडल्यास संबंधिताला दवाखान्यात घेऊन जा.
1078 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या. शक्य असल्याल बाधिताला दवाखान्यात घेऊन जा.
वाचक बंधू-भगिनींनो… वरील माहिती आपणास आवडली असल्यास आपले मित्र, नातेवाईक व आपल्या गावातील ग्रुप वर शेअर करण्यास विसरू नका! सरकारी योजना, जॉब अलर्ट व बातमी मागील बातमी जाणून घेण्यासाठी वाचत रहा महा जागरण… डेली अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा!
Tag: #Maha Jagran #mahajagran #महा_जागरण बातमी नव्हे तथ्य!