विवाहित महिला ‘लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार’ केल्याचा आरोप करु शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय.

सुप्रीम कोर्टाने फौजदारी न्यायव्यवस्थेच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, जेव्हा संमतीने संबंध बिघडतात तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. कोर्टाने म्हटले आहे की जेव्हा एखाद्या विवाहित महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध असतात, तेव्हा ती त्याच्याविरुद्ध त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले असा आरोप करत बलात्काराचा खटला दाखल करू शकत नाही.
गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, अशा परिस्थितीत महिला बलात्काराचा खटला दाखल करू शकत नाही कारण ती आधीच विवाहित असल्याने ती कायदेशीररित्या लग्न करण्यास पात्र नव्हती. कोर्टाने म्हटले आहे की तक्रारदार जेव्हा संबंधात होती तेव्हा ती आधीच विवाहित होती आणि हे “संमतीने संबंध बिघडवण्याचे क्लासिक प्रकरण” आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वकिलावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या एका महिला वकिलाने दाखल केलेल्या खटला फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

खंडपीठाने स्पष्ट केले की, जरी एखाद्या महिलेने लग्नाच्या खोट्या आश्वासनाच्या आधारे लैंगिक संबंध ठेवले असले तरी ती बलात्काराचा खटला दाखल करू शकत नाही. कारण ती स्वतः लग्नासाठी पात्र नव्हती, कथित गुन्ह्याच्या वेळी किंवा नंतरही नाही. हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम ५(i) नुसार, जर एखाद्या व्यक्तीचा आधीच जिवंत जोडीदार असेल, तर तो किंवा ती दुसरे लग्न करू शकत नाही.

खंडपीठाने टिप्पणी केली की, जरी युक्तिवादाच्या निमित्ताने असे गृहीत धरले गेले की लग्नाचे खोटे वचन देऊन आरोपीने लैंगिक संबंध ठेवले होते, तरीही असे वचन कायदेशीररित्या लागू होणार नाही आणि त्यावर कारवाई करता येणार नाही. कारण पीडिता स्वतः लग्नासाठी पात्र नव्हती.

Leave a Reply