दिंद्रुड दि.1 (प्रतिनिधी) :- माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री आठ वाजे दरम्यान घडली. मयत तिघेही माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील असून हमाली (मजुरी) करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांच्या अपघाती निधनाने तीन कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडली आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तेलगाव येथील जिनिंग वर मजुरी करुन दुचाकीवरून गावाकडे परतत असतांना माजलगाव कडून धारूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने जबरदस्त धडक दिल्याने लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३६ वर्ष), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३० वर्ष ), अण्णा बळीराम खटके (वय 27 वर्ष) सर्व राहणार लहामेवाडी हे तरुण ठार झाले. संध्याकाळी गावाकडे परतत असताना माजलगाव तेलगाव हायवेवरील टालेवाडी पाटीजवळ काही अंतरावर ही घटना घडली.
चारचाकी वाहनाने दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की, यातील दोघांना चारचाकीने दूरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे दोघेजण जागेवरच ठार झाले. तर एकाला उपचारार्थ माजलगाव येथील दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. मयत तिघेही विवाहित असून आण्णा खटके यास 2 वर्षाची मुलगी व केवळ 6 महिन्याचा मुलगा आहे. नितीन हुलगे यास 7 वर्षाचा मुलगा व 10 वर्षाची मुलगी आहे तर लक्ष्मण कापसे यास 2 मुली व 1 मुलगा आहे. तिघेही गरीब कुटुंबातील असल्याने हमाली व मोलमजुरी करुन पोट भरत होते. या तीन तरुणांच्या अपघाती निधनाने लहामेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रभा पुंडगे आपल्या लवाजम्यासह दाखल झाल्या असून रात्री उशिरा पर्यंत पंचनामा करण्याचे काम चालू होते.
■■■■■ चौकट
● दुर्दैवी योगायोग
आठ दिवसांपूर्वी लहामेवाडी येथील भारत गायकवाड नावाचा तरुण देवदहीफळ येथे एका इमारतीस रंग देत असतांना पडून जखमी झाला होता. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात उपचार चालू असतानाच आज त्याची प्राणज्योत मालवली. गावकरी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतांनाच या भीषण अपघाताची बातमी येऊन धडकली. एकाच गावातील चार तरुण मयत झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.