राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन आता ‘अमृत उद्यान’ म्हणून ओळखलं जाणार
नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डन (Mughal Garden) यापुढे अमृत उद्यान (Amrit Udyan) या नावाने ओळखले जाईल.
मोदी सरकारने २०१४ नंतर शहर, रस्ते आदी ची नावे बदलण्यास प्राधान्य दिलं आहे.विवीध सार्वजनिक ठिकाणांना देण्यात आलेली अन्यायी, अत्याचारी राज्यकर्त्यांची नावे बदलून गुलामीची आठवण कायमची नष्ट करणे,ही त्यामागील मुख्य भुमिका असल्याचे बोलले जाते. आज देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे.
हे गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखले जाते. राष्ट्रपती भवनाचे हे गार्डन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या गार्डनमध्ये १३८ प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली आहे. या गार्डनमध्ये १० हजारांहून अधिक ट्युलिप फुलेही आहेत. याशिवाय हंगामी फुलांच्याही ५००० प्रजाती आहेत.
राष्ट्रपतींच्या माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी मुघल गार्डनच्या नामांतराची माहिती दिली. ते म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनाच्या गार्डनला ‘अमृत उद्यान’ असे सामान्य नाव दिले आहे.