सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली ‘हिंदु’ची व्याख्या
नागपूर: भारताला आपला मानतो आणि प्रतिकूल परिस्थितीत त्याचा स्वीकार करतो, असा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात ‘संघ शिक्षा वर्ग’ किंवा तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, एखादी व्यक्ती कोणतीही भाषा बोलत असली, कोणत्या धर्माचे पालन करते किंवा तो नास्तिक असला तरी देशाला आपला मानतो, तो हिंदू असतो. आपल्या भाषणात, त्यांनी पुनरुच्चार केला की भारतातील लोकांना विविधतेत एकतेच्या संस्कृतीत राहायचे आहे आणि या दिशेने प्रयत्न करायचे आहेत.’
ते पुढे म्हणाले की, ‘प्रत्येक भारतीयाला आपल्या धर्माचा आणि भाषेचा अभिमान असला पाहिजे, परंतु भारतीयांनी संघटित होऊन भारताला प्रथम स्थान दिले पाहिजे. देश प्रथम येतो. आम्ही आरएसएसच्या स्वयंसेवकांना हेच शिकवतो.”
भारताच्या G20 अध्यक्षपदाचे कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले की, संपूर्ण जग भारताकडे एका चांगल्या उद्याच्या दिशेने पाहत आहे. संपूर्ण जगाला एकत्र आणण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जगाला हे समजले आहे की केवळ भारतच चांगल्या जगाचा मार्ग प्रशस्त करू शकतो.
यावेळी ते म्हणाले, “जगाला आता भारताची गरज आहे. भारताचे नाव जागतिक चर्चेत आहे आणि भारतीयांनाही खात्री आहे की ते जगाचे नेतृत्व करू शकतात.” ते म्हणाले, “भारताला G20 चे अध्यक्षपद मिळणे ही सामान्य गोष्ट नाही. पण ही फक्त सुरुवात आहे आणि आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि संपूर्ण समाजाला भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दिशेने काम करायचे आहे.