महा जागरण रविवार विशेष: पवन मोगरेकर
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघ बदलण्याबाबत सूतोवाच केले होते नंतर त्यांनी मी परळीतुनच लढणार असे सांगितले. या पार्श्वभूमीवर महा जागरण चे राजकीय संपादक पवन मोगरेकर यांनी केलेले हे भाष्य….
बीड: ही घटना २००९ वर्षातील आहे.मतदारसंघाची पुनर्रचना झाली, देवेंद्र फडणवीसांचा परंपरागत नागपूर पश्चिम मतदारसंघ कायम राहिला तसेच हा मतदारसंघ पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गालाही सुटला तरीही देवेंद्र फडणवीस त्यांच्या परंपरागत नागपूर पश्चिम मधून उभे न राहता त्यांनी नवीन मतदारसंघ शोधला तो होता नागपूर दक्षिण- पश्चिम! देवेंद्र फडणवीस भावनेत न अडकता त्यांनी बदललेल्या राजकीय समीकरनाचा अभ्यास करत राजकीय वास्तव स्वीकारून मतदारसंघ बदलला व स्वतःचे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवले. यावेळी त्यांच्यावर ते पलायन करीत आहेत,संघर्षाला घाबरत आहेत असा आरोप कुणीही केला नाही. परंतु, पंकजा मुंडे मतदारसंघ बदलणार अशी साधी चर्चाही सुरू झाली की ताई राजकीय संघर्ष सोडून पलायन करीत आहेत,ताईंनी पराभवाचा बदला घेतला पाहिजे,वडिलांचा मतदारसंघ नाही सोडला पाहीजे, या प्रकारचे डोस देणारी गँग चांगलीच सक्रिय होते.
परळी हा गोपीनाथरावांचा मतदारसंघ होता का?
गोपीनाथराव मुंडे यांचा परंपरागत मतदारसंघ होता रेणापूर. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर या मतदारसंघातील बहुतांश गावे लातूर ग्रामीण मधे गेली आणि माजलगाव मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील गावे परळी मतदारसंघास जोडण्यात आली.संवेदनशील यामुळे की याच पट्याने सुंदरराव सोळंके व गंगाधर अप्पा बुरांडे यांचा पराभव केला होता.परळी मतदारसंघ निर्माण झाल्यापासून गोपीनाथरावांनी एकदाही या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली नाही असे असताना परळी हा पंकजा मुंडेंचा परंपरागत मतदारसंघ कसा होऊ शकतो?
२००९ साली सक्षम विरोधक नसणे, २०१४ साली सहानभूती व प्रचंड मोदी लाट यामुळे खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा अंदाज आला नाही २०१४ च्या मोदी लाटेत जिल्ह्यातील भाजपची इतर उमेदवार चाळीस, पन्नास हजारांच्या फरकाने जिंकत असतांना इथे ताईंचा व धनंजय मुंडेंच्या मतातील फरक केवळ २० हजाराच्याच आसपास होता. मोदी लाट व गोपीनाथराव मुंडे यांची सहानभूती असतानाही परळीकरांनी ताईंना हात आखडूनच मतदान दिलं होतं हे विशेष.
परळी पूर्वी पेक्षा कठीण राहणार?
२०१९ च्या निवडणुकीत परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याआधी भगवान भक्ती गड येथे गृहमंत्री अमित शाह तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभा होऊनही पंकजा मुंडेंचा मोठा पराभव झाला.वर्तमानात धनंजय मुंडेंनी मंत्री पदाच्या कार्यकाळात स्वतःचे संघटन चांगलेच वाढवले आहे. परळी बाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या देहबोलीत विश्वास जाणवत नाही त्यात वैद्यनाथ कारखाना अडचणीत असल्याने परळी तालुक्यातील शेतकऱ्यांमधे पंकजा मुंडे बाबत असंतोष दिसत आहे. यात धनंजय मुंडेंनी आंबा कारखाना चांगला चालवून परळी तालुक्यातील बराचसा ऊस आंबा कारखान्याला नेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे.परळी मतदारसंघाबाबत एवढया प्रतिकूल गोष्टी असताना केवळ भावनेच्या भरात परळीवरच ठाम राहणे म्हणजे महाभारतातील धर्मराजा प्रमाणे स्वतःचे राजकीय अस्तित्व पणाला लावण्या सारखे होईल. पंकजा ताई राज्याच्या नेत्या आहेत, केवळ परळीच्या नाहीत!त्यांनी स्वतःला परळीत अडकून ठेऊ नये.राजकारणात भावनेला काडीची किंमत नसते,किंमत असते ती केवळ तुमच्या राजकीय अस्तित्वाला.देवेंद्र फडणवीसांचे वरील उदाहरण याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.देवेंद्र फडनविस पश्चिमेकडून दक्षिणेकडे येऊ शकतात तर पंकजा ताई तुम्ही दक्षिणे कडून उत्तरेकडे (माजलगाव) का येऊ शकत नाहीत?
पाथर्डी की माजलगाव? वाचा पुढील अंकात…