रानडुक्कराच्या हल्ल्यात महिलेचे दोन्ही पाय निकामी
माजलगाव: माजलगाव तालुक्यात रान डुकरांनी उच्छाद मांडला असून शेतकरी शेतमजूर यांच्यात दहशत निर्माण केली आहे.तालुक्यातील लवुळ क्र.२ येथील गणेश तांडा येथील एका महिलेस गुरूवारी चावा घेतल्याने महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले.या महिलेवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.तर दुसऱ्या महिलेच्या हाताला चावा घेतला घेतल्याने ही महिला देखील गंभीर जखमी झाली.
या विषयी अधिक माहिती अशी की, सुंदराराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी टोळी लवुळ क्र.२ येथील श्रीरंग कुरे यांच्या शेतात आली असता या ऊसतोड मजुरा मधील जयश्री बाबुराव मुजमुले ( वय ४०) रा.कारी ता.वडवणी ही महिला सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक करत असताना अचानक एका रानडुकरांने येऊन या महिलेच्या हाताला चावा घेतला असता ती ओरडत असताना शेतात शेजारी राहत असलेल्या नाथाबाई उत्तम राठोड ( वय ६२) या पहावयास गेल्या असताना या डुकराने नाथाबाई यांच्या अंगावर धाव घेतली व पायाच्या पंजाला तर दुसऱ्या पायाच्या मांडीला चावा घेतला. त्यानंतर या महिलेस जोरदार धडक मारल्याने ही महिला बाजुला असलेल्या दगडावर जाऊन पडल्याने गुडघा निकामी झाला.
या दोन्ही महिलेवर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यातील नाथाबाई राठोड या महिलेस पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. या महिलेचे दोन्ही पायाचे तीन ऑपरेशन करण्यास सांगितले तर एका ठिकाणी प्लास्टिक सर्जरी देखील करावी लागणार असल्याचे या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले.