…तर महाविकास आघाडीत फूट!
मुंबई, (प्रतिनिधी): राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे.महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत हिंगोली येथे एका सभेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सारवरकर यांच्यावर टीका केली. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी देखील आज मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेशी सहमत नसून त्यांच्या या वक्तव्यामुळे मविआमध्ये फूट पडेल, असे असे स्पष्ट शब्दात राऊत यांनी म्हटले आहे.याबाबत पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही. या बाबत आम्ही आमची भूमिका कालच स्पष्ट केली आहे. सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याबद्दल काही चुकीचे वक्तव्य केली तर ती शिवसेनेला मान्य नाही. ते सहन देखील केले जाणार नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेला आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला आहे. गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. इतिहासात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्याव असे देखील राऊत यावेळी म्हणाले.