अजित पवार यांनी दिले संकेत!
पुणे ( डी. अशोक ): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा जोरदार चर्चा सुरु आहेत. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवशी बारामती मतदारसंघात त्यांचे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. यावर त्यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असं खरोखर घडल्यास हि लढाई रंगतदार व लक्षवेधी होईल.
सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला असता यावर प्रतिक्रिया देताना “आम्ही विचार करु. वेळ येईल त्यावेळी त्या त्या गोष्टींचा विचार केला जाईल”, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात सुनेत्रा पवार विरुद्ध विद्यमान खासदार अशी राजकीय फाईट होऊ शकते, अशा प्रकारचे संकेत त्यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक पक्ष तयारीस लागला आहे.अजित पवार व भाजप यांची युती होण्यापूर्वीच भाजप ने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेले आहे.त्यासाठी वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांना या लोकसभा मतदारसंघात प्रवासाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.त्यांनी या मतदारसंघात प्रवास करून भाजप बारामती जिंकणारच! असा विश्वास व्यक्त केला होता.आता अजित पवारच भाजप सोबत आल्याने त्यांच्या या वक्तव्यास महत्व आले आहे.काहीका असेना या मतदारसंघात होणारी लढाई रंगतदार होणार यात तिळमात्र शंका नाही.