मनोज कोरडे यांना ‘आदर्श गोरक्षक पुरस्कार’ प्रदान

 

माजलगाव दि.10 (प्रतिनिधी):-
मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या मराठा साम्राज्य विजय दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात युवा गोरक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज सुनंदा प्रशांत कोरडे यांना ‘आदर्श गोरक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हिंदुत्ववादी विचारांचे प्रणेते ॲड. मिलिंद एकबोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी गुजरातच्या त्रिपुरा सुंदरी मठाचे मठाधिपती विश्वेश्वरानंदजी महाराज, आमदार कैलास पाटील, रामनारायण मराठा, शिवाजी राजेजाधव, दिग्दर्शक व अभिनेते सुधीर निकम, रवींद्र पडवळ, गोरक्षनाथ अबुज आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन हिंदु धर्म व गो-संरक्षणासाठी अधिक तीव्रतेने काम करण्याचा संकल्प यावेळी केला.
1763 साली राक्षसभुवन येथे झालेल्या लढाईत मराठ्यांच्या शौर्याचा सन्मान म्हणून “मराठा साम्राज्य विजय दिन” साजरा करण्यात आला. यानिमित्ताने समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. अनेक वर्षे गोसेवा, गो-संरक्षण आणि गो-तस्करी विरोधात अविरत कार्य करणारे मनोज कोरडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘आदर्श गोरक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह सर्वच गोरक्षकांच्या प्रयत्नाने शेकडो गोवंशाचे प्राण वाचले असून समाजात गोमातेबद्दल जागृती निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ॲड. मिलिंद एकबोटे यांनी यावेळी हिंदू संस्कृती, गोमातेचे महत्व आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासावर मार्गदर्शनपर भाषण केले. त्यांनी गोरक्षकांच्या कार्याचे कौतुक करत, गोसेवा हीच राष्ट्रसेवा आहे असे प्रतिपादन केले. यावेळी गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply