जालना/बीड : आतापर्यंत शांततेत सुरु असणारे मराठा आरक्षण आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे.जालन्यात तहसीलदारांची गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.तर बीड मध्ये दोन एस.टी.बसेस वर तुफान दगडफेक करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केलेले असताना त्यांच्याच जिल्ह्यात थेट तहसीलदार यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जालना शहरात उमटले. मराठा समाजबांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी लवकर भेट न दिल्याने संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली आहे. जालना मंठा रोडवरील बाजी उमरद फाट्यावर ही घटना घडली आहे. मराठा आंदोलकांकडून जालना मंठा रोडवर रस्ता रोको सुरू होते. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून तहसीलदार छाया पवार देखील घटनास्थळी आहेत.
जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांना चर्चेसाठी येण्याची मागणी होती. दरम्यान तहसीलदार छाया पवार या जालन्यावरून आंदोलकांची भेट घेण्यासाठी बाजीउम्रदला जात असताना बाजीउम्रद फाट्यावर आंदोलकांनी तहीलदारांची गाडी आडवत दगडफेक केली. दरम्यान घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा असून सध्या परिसरात शांततापूर्ण तणावाचे वातावरण आहे.
बीड मध्ये आंदोलकांकडून दोन बसची नासधूस;बससेवा बंद
बीडमध्ये मध्यरात्री बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला. तर बीडच्या धुळे सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली. यानंतर रात्री बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा सकाळी बस चालू होताच आंदोलकांनी बीडच्या चराटा फाटा रोडला कल्याण गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत या गाडीचं नुकसान केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. आंदोलक हिंसक भूमिका घेत असल्याने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पुढील आदेश येत नाही तोपर्यंत बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.